Cheteshwar Pujara | भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) गेल्या काही काळापासून संघात संधी न मिळाल्याबद्दल आपली निराशा व्यक्त केली आहे. पुजारा जून 2023 पासून भारतासाठी (Indian Cricket Team) खेळलेला नाही. मात्र, त्याने पुन्हा एकदा संघासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात बोलताना पुजाराने संघात निवड न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तसेच, आगामी इंग्लंड दौऱ्यात भारताकडून संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा भक्कम दावेदार मानला जाणाऱ्या पुजाराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्ये त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात होती, मात्र निवड समितीने त्याला संधी दिली नाही. पुजाराने सांगितले की, खेळावरील प्रेमामुळे तो आजही प्रेरित आहे आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा देशासाठी खेळायला तो तयार आहे.
‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात बोलताना पुजारा म्हणाला, “जेव्हा तुम्ही सर्वोच्च स्तरावर यशस्वी झाला असाल, 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले असाल आणि तरीही तुम्ही संघाचा भाग नसाल, तेव्हा तुम्ही ती कठोर मेहनत चालू ठेवता जी तुम्हाला यश मिळवून देणारी ठरली आहे.
‘संधी न मिळणे मोठी निराशा आहे, पण या खेळावरील माझ्या प्रेमामुळे मी स्वतःला तयार आणि प्रेरित ठेवतो. आणि त्याच प्रेमातून, जास्त अपेक्षा न ठेवता मी स्वतःला खेळाच्या आणि सरावाच्या जवळ ठेवतो, मग ती संधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये असो किंवा काउंटी क्रिकेटमध्ये.”, असे तो म्हणाला.
दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता भारतीय संघासाठी जूनमध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका (England Test Series) अत्यंत महत्त्वाची आहे. या आगामी मालिकेत संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे पुजाराने सांगितले.
तो म्हणाला, “भारतीय संघ खूप स्पर्धात्मक राहिला आहे, पण जवळपास 20 वर्षांपासून त्यांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे जर संधी मिळाली, तर मी माझ्या परीने सर्वोत्तम योगदान देऊ इच्छितो आणि संघाला गरज असल्यास संधीचा पुरेपूर फायदा घेईन. इंग्लंडमध्ये विजयाची नितांत गरज असताना योगदान देण्यासाठी ही एक उत्तम संधी असेल.”