Gautam Gambhir | भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी काही माजी क्रिकेटपटूंवर टीका करत भारतीय क्रिकेटला आपली ‘खाजगी मालमत्ता’ समजत असल्याचा आरोप केला आहे. गंभीरने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, त्यांच्या खेळण्याच्या दिवसांपासून त्यांची टीका करणाऱ्या मुंबईच्या दोन माजी भारतीय कर्णधारांना (Former Indian Captains) लक्ष्य केल्याचे संकेत दिले आहेत.
गंभीरने ‘एबीपी न्यूज’च्या कार्यक्रमात बोलताना काही माजी क्रिकेटपटूंवर नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गंभीर म्हणाला की, ‘मी आठ महिन्यांपासून हे काम करत आहे. निकाल आले नाहीत तर मला टीकेची पर्वा नाही. टीका करणे लोकांचे काम आहे. काही लोक 25 वर्षांपासून समालोचन करत आहेत आणि त्यांना वाटते की भारतीय क्रिकेट त्यांची खाजगी मालमत्ता आहे.’
गंभीरने जोर देऊन सांगितले की, ‘भारतीय क्रिकेट कोणाची जहागीर नाही, तर 140 कोटी भारतीयांची संपत्ती आहे. या लोकांनी माझ्या प्रशिक्षणावर, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) बक्षीस रकमेच्या वाटपावर प्रश्न उपस्थित केले आहेत.’
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेबद्दल बोलायचे झाल्यास, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ‘स्पोर्टस्टार’साठी लिहिलेल्या त्यांच्या लेखात आश्चर्य व्यक्त केले होते की, गंभीर राहुल द्रविडचे (Rahul Dravid) अनुकरण करेल आणि सहकारी कर्मचाऱ्यांसोबत बक्षीस रक्कम वाटून घेतील का?
गावस्कर यांनी लिहिले होते, ‘भारताच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) विजयानंतर नेहमीच एक संघ खेळाडू राहिलेल्या राहुल द्रविडने आपल्या सहकारी प्रशिक्षकांपेक्षा जास्त रक्कम न घेण्याचा निर्णय घेतला.’ ते पुढे म्हणाले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीसांची घोषणा झाली, तेव्हा गंभीर द्रविडचा दृष्टिकोन स्वीकारणार की नाही, यावर आम्ही विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीरची कोणतीही प्रतिक्रिया ऐकली नाही. द्रविडचे उदाहरण आता महत्त्वाचे राहिले नाही का?’
गंभीरने गावस्कर यांचे नाव घेतले नसले तरी, लेखात विचारलेले प्रश्न त्यांना आवडले नाहीत हे स्पष्ट होते. गंभीर म्हणाला की, ‘मी पैसे दिले आहेत की नाही, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड फेकू नयेत.’
गंभीरने कर्णधार रोहित शर्मासोबतच्या (Rohit Sharma) मतभेदांच्या बातम्याही फेटाळून लावल्या. गंभीर म्हणाला की, ‘हे लोक कोण आहेत जे या सर्व गोष्टी बोलत आहेत? हे अंदाज तज्ञ आणि यूट्यूब चॅनेल चालवणारे लावत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका प्रशिक्षकाने आणि एका कर्णधाराने मिळून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. कल्पना करा की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तर तुम्ही काय विचारले असते? रोहितने भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या कामाचा मी आदर करतो.’