Hulk Hogan Death: व्यावसायिक कुस्तीला अब्जावधी डॉलरच्या मनोरंजन उद्योगात रूपांतरित करण्यास मदत करणारे, WWE सुपरस्टार हल्क होगन (Hulk Hogan Death) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
WWE ने त्यांच्या निधनाची बातमी देताना सांगितले की, हॉल ऑफ फेमर हल्क होगन यांच्या निधनाबद्दल दुःख झाले आहे. होगन यांनी 1980 च्या दशकात डब्ल्यूडब्ल्यूईला जागतिक ओळख मिळवून दिली. डब्ल्यूडब्ल्यूई होगनच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना संवेदना व्यक्त करते,” असे डब्ल्यूडब्ल्यूईच्या निवेदनात म्हटले आहे.
रिपोर्टनुसार , गुरुवारी (24 जुलै 2025) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याच्या कॉलवर होगनच्या क्लियरवॉटर, फ्लोरिडा येथील निवासस्थानी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निधनाच्या काही आठवड्यांपूर्वीच होगन मोठ्या हृदय शस्त्रक्रियेतून बरे होत होते. रिपोर्टनुसार, नुकतीच त्यांची ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती.
80 आणि 90 च्या दशकातील रेसलिंगचे प्रतीक
होगन यांचे खरे नाव टेरी बोलिया होते. ते व्यावसायिक कुस्तीला जगभरात लोकप्रियता मिळवून देण्यात आघाडीवर होते. 1980 आणि 1990 च्या दशकात डब्ल्यूडब्ल्यूईला जगभरात लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
टेरी जीन बोलिया यांचा जन्म 11 ऑगस्ट 1953 रोजी जॉर्जियातील ऑगस्टा येथे झाला. सुरुवातीला स्थानिक रॉक बँडसाठी बास गिटारिस्ट असलेले होगन, 1970 च्या दशकात रेसलिंगकडे आकर्षित झाले, जिथे त्यांनी रिंगमध्ये नवीन करिअरसाठी प्रशिक्षण सुरू केले.
त्यांच्या ‘हल्क’ या टोपणनावाला चाहते त्यावेळी टीव्हीवर दिसणाऱ्या कॉमिक बुक पात्राशी त्यांच्या साम्यामुळे मिळाले. 90च्या दशकात ते वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचा (डब्ल्यूडब्ल्यूएफ) चेहरा बनवले होते.
त्यांनी रेसलिंगसोबतच ‘सबर्बन कमांडो’ आणि ‘मिस्टर नॅनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि 2005 ते 2007 पर्यंत ‘होगन नोज बेस्ट’ नावाचा व्हीएच1 रिॲलिटी शो केला, ज्यात त्यांच्या तत्कालीन पत्नी लिंडा आणि त्यांच्या दोन मुलांसोबतचे कौटुंबिक जीवन दाखवले होते. एवढेच नाही तर 2024 मध्ये होगन यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सार्वजनिकरित्या पाठिंबा दिला होता.