India vs England 4th Test: इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताला (India vs England 4th Test) यश आले आहे. एकवेळी पराभवाच्या छायेत असलेल्या भारताना शानदार खेळी करत सामना अनिर्णित राखला.
शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धचा (Ind vs Eng Test) चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 358 धावा केल्या होत्या.
पहिल्या डावात इंग्लंडने (Ind vs Eng Test) 10 गडी गमावून 669 धावा करत 311 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 425 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
गिल-राहुलची विक्रमी भागीदारी
पाचव्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात दोन गडी बाद 174 धावसंख्येवरून झाली, त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 137 धावांनी मागे होता आणि शुभमन गिल व केएल राहुल खेळपट्टीवर होते. पहिल्या सत्रात 188 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. बेन स्टोक्सने केएल राहुलला पायचीत बाद केले.
राहुलने 230 चेंडूंमध्ये 90 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी त्याने गिलसोबत 421 चेंडूंमध्ये 188 धावांची भागीदारी केली. यासह केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय जोडीने एका कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम केला. यापूर्वीचा विक्रम संजय बांगर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता, ज्यांनी 2002 मध्ये लीड्स येथे 405 चेंडू खेळले होते.
गिलचे ऐतिहासिक शतक आणि ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने शुभमन गिलसोबत 34 धावांची भागीदारी केली. यावेळी कर्णधार गिलने 238 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या, ज्यात 12 चौकारांचा समावेश होता. गिलने या मालिकेतील चौथे शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक आहे.
या शतकासह गिलने डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्णधार म्हणून एका मालिकेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ब्रॅडमनच्या नावावर आहे; त्यांनी 1947 मध्ये भारताविरुद्ध चार शतके झळकावली होती. आर्चरने गिलला यष्टीरक्षक जेमी स्मिथकरवी झेलबाद केले.
जडेजा-सुंदरची निर्णायक भागीदारी
4विकेट गमावल्यानंतर भारताचा पराभव होणार असे वाटत असतानाच, वॉशिंग्टन सुंदरला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. या दोघांनी शेवटपर्यंत भारताचा डाव सांभाळला आणि केवळ डावाने होणाऱ्या पराभवाचे संकटच टाळले नाही, तर सामना अनिर्णित राखला.
चौथ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 334 चेंडूंमध्ये 203 धावांची नाबाद भागीदारी झाली. यावेळी जडेजाने 182 चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले, तर सुंदरने 206 चेंडूंमध्ये आपले पहिले कसोटी शतक झळकावले. दोघे अनुक्रमे 107 आणि 101 धावांवर नाबाद राहिले.
दरम्यान, पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड (India vs England Test Series) अजूनही 1-2 ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून द ओव्हल मैदानावर खेळला जाईल.