India vs Pakistan WCL match | वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या (WCL 2025) दुसऱ्या पर्वातील भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) लेजेंड्स यांच्यातील रविवारी (20 जुलै) एडबॅस्टन येथे होणारा सामना रद्द करण्यात आला आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयोजकांनी (organisers) हा सामना रद्द केला आहे.
एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम क्रीडाक्षेत्रावरही दिसून येत आहे.
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने उशिरा X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट करत एक पत्र शेअर केले. त्यामध्ये सांगण्यात आले की, 11 मे रोजीच त्यांनी आयोजकांना याबाबत माहिती दिली होती.
या निर्णयात धवनसोबतच हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनीही सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे आयोजकांवर सामना रद्द करण्याचा दबाव वाढला होता.
आयोजकांची माफी, पुढचे सामने वेळापत्रकानुसार
WCL आयोजकांनी आपल्या निवेदनात भारतीय संघाच्या भावना लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. “आम्ही भावनांवर आदर ठेवतो. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, तर चाहत्यांना आनंदाचे क्षण द्यायचे होते,” असं ते म्हणाले.
Dear all , pic.twitter.com/ViIlA3ZrLl
— World Championship Of Legends (@WclLeague) July 19, 2025
दरम्यान, इंडिया चॅम्पियन्स संघातील अन्य सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील. भारताचे पुढील सामने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांविरुद्ध होणार आहेत. भारतीय संघात युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरॉन आणि विनय कुमार यांचा समावेश आहे.