India vs England Test Series Record: भारत आणि इंग्लंडमधील पाचवा कसोटी (India vs England Test Match) सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इंग्लंडला पाचवा सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. तर भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी केवळ 4 विकेट्स आवश्यक आहेत. या कसोटी मालिकेत एकापेक्षा एक विक्रम पाहायला मिळाले. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी धावांचा डोंगर उभारल्याचे दिसून आले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कसोटी मालिकेत (India vs England Test Series Record) नऊ फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हा विक्रमी आकडा गाठला गेला आहे.
या मालिकेत शुभमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि यशस्वी या भारताच्या 5 फलंदाज, तर इंग्लंडच्या बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक या 4 खेळाडूंनी 400 पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला आहे.
कसोटी क्रिकेटचा पहिला सामना 1877 मध्ये खेळला गेला असला, तरी गेल्या 141 वर्षांत दोन वेळाच (1975-76 आणि 1993 मध्ये) एका मालिकेत 8 फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पण, एकाच मालिकेत 9 फलंदाजांनी 400 धावांचा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एका कसोटी मालिकेत 400 पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज
- 9 – भारत आणि इंग्लंड यांच्यातील 2025 ची मालिका
- 8 – वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 1975-76 ची मालिका
- 8 – द ॲशेस, 1993
भारत-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा
शुभमन गिलने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 10 डावांमध्ये 4 शतकांच्या मदतीने एकूण 754 धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही कसोटी मालिकेत इतक्या धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. गिलने इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहम गूचचा 35 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. गूचने 1990 मध्ये भारताविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 752 धावा केल्या होत्या.