IPL 2025 | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना रद्द करण्यात आला. जवळपासच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरनवाजत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) एका निवेदनात सांगितले की, पीबीकेएस विरुद्ध डीसी सामना तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आला. मात्र, आता उर्वरित आयपीएल स्पर्धा पूर्ण होणार की नाही? यावरच प्रश्न निर्माण झाला आहे. भारत-पाकमधील वाढता तणाव व सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल स्थगित केली जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सांगितले की, बोर्ड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इंडियन प्रीमियर लीगच्या भविष्याबाबत सरकारचा सल्ला घेत आहे. परिस्थिती दररोज बदलत असल्याने बीसीसीआय 9 मे रोजी आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. “आम्हाला जे सांगितले जाईल ते आम्ही करू आणि सर्व संबंधितांना त्याची माहिती देऊ. सध्या, आमचे प्राधान्य सर्व खेळाडू, चाहते आणि संबंधितांच्या सुरक्षिततेला आहे,” असे शुक्ला यांनी सांगितले.
जर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली, तर बीसीसीआय काही काळासाठी स्पर्धा थांबवण्याचा विचार करू शकते. कारण भारतीय क्रिकेट संघाचे जूनपर्यंत कोणतेही वेळापत्रक नाही. परिस्थिती सुधारल्यावर ते स्पर्धेला पुन्हा सुरुवात करू शकतात. मात्र, परदेशी खेळाडू (Overseas players) त्यांचा मुक्काम वाढवण्यास तयार होतील की नाही? याबाबत प्रश्न आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board – PCB) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League – PSL) च्या दहाव्या हंगामातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्याची घोषणा केली आहे.
पीसीबीने खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे हा निर्णय घेतला आहे. इस्लामाबादमध्ये (लीगची एक तातडीची बैठक झाली, ज्यात पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी परदेशी खेळाडूंशी चर्चा केली. उर्वरित सामन्यांमध्ये 4 लीग-स्टेजचे सामने आणि प्लेऑफचा समावेश आहे. हे सामने रावळपिंडी, मुलतान आणि लाहोरमध्ये होणार होते.