ईशान किशनच्या वादग्रस्त विकेटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा; मॅच फिक्सिंगचे आरोप, पाहा व्हिडिओ

Ishan kishan match fixing allegations

Ishan kishan match fixing allegations | सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने केवळ 143 धावा केल्या. मात्र या सामन्याचा सर्वात चर्चेचा क्षण ठरला ईशान किशनची (Ishan Kishan Controversy) वादग्रस्त विकेट.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अपील केले नाही तरीही ईशान मैदान सोडून गेला. सुरुवातीला त्याने खिलाडूवृत्ती दाखवल्याचे वाटले, पण रिप्लेमध्ये तो नॉट आऊट असल्याचे स्पष्ट झाले. मग तो मैदान सोडून का गेला, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आणि त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे (Match Fixing Allegations) आरोपही होऊ लागले.

कसा आऊट झाला ईशान किशन?

सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट ट्रॅव्हिस हेडच्या रूपात पडल्यानंतर ईशान किशन मैदानात उतरला होता. डावातील तिसरे षटक दीपक चहर टाकत होता. या षटकातील पहिला चेंडू लेग साइडला गेला, ज्याला ईशान खेळू इच्छित होता, पण तो चुकला आणि चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला. गोलंदाज आणि विकेटकीपर दोघांनीही अपील केले नाही, कारण सर्वांना वाटले की तो वाईड चेंडू आहे.

अंपायरनेही वाईड देण्यासाठी हात वर केला होता, पण अचानक ईशान किशनला व्हेलियनच्या दिशेने जाताना पाहून ते देखील आश्चर्यचकित झाले. त्यामुळे नाइलाजाने अंपायरलाही त्याला आऊट द्यावे लागले. सुरुवातीला सर्वांना वाटले की ईशानने खिलाडूवृत्ती दाखवली, पण रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाच नव्हता.

क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. एका युजरने ‘एक्स’वर लिहिले, “मॅच फिक्सिंग अशीच असते. कोणतंही अपील नाही, पण खेळाडू आऊट. अंपायरही गोंधळलेला.”

ईशान किशन केवळ 1 धाव काढून बाद झाला आणि संघासाठी एक महत्त्वाची विकेट गमावली. त्यानंतर 9 व्या षटकापर्यंत 5 विकेट्स पडल्या आणि संघाची धावसंख्या केवळ 35 होती. ईशानने मागील 7 सामन्यांत केवळ 33 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा विजय

144 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सहज विजय मिळवला. रोहित शर्माने 70 धावांची संयमी खेळी केली आणि सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 40 धावा ठोकत सामना पूर्ण केला. मुंबईने 26 चेंडू राखून सामना जिंकला. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानानावर आहे.