IPL 2025 | भारत – पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा काही दिवसांसाठी स्थगिती करण्यात आली होती. मात्र स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, स्पर्धेच्या सुरुवातीलाच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) दुखापतीमुळे पुनरागमन करू शकेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे हेजलवूड आयपीएलमध्ये खेळणार की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर लक्ष्य केंद्रित करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जॉश हेजलवूड न खेळल्यास हा आरसीबीसाठी मोठा धक्का असू शकतो. या स्पर्धेत हेजलवूडने आरसीबीकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. त्याने 10 सामन्यात संघासाठी सर्वाधिक 18 विकेट्स घेतले आहेत. तसेच, आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे हेजलवूड न खेळल्यास आरसीबीला मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, बीसीसीआय (BCCI) आयपीएल पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. दुसरीकडे, किती परदेशी खेळाडू परत खेळण्यासाठी येणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांचे प्रमुख खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होतील की नाही, याबाबत साशंकता आहे.
या खेळाडूंचेही परतणे कठीण
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडयांनाही आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर भारतात परतण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण त्यांना डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा विचार करावा लागेल. स्टार्क दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे आणि त्यांची टीम अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. तर, सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे देखील पुढील सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.