Kagiso Rabada Suspension | गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) वैयक्तिक कारण देत आयपीएल 2025 मध्येच सोडून दक्षिण आफ्रिकेला परतला होता. त्यावेळी स्पर्धा मध्येच सोडण्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता याबाबतची माहिती समोर आली आहे.
कागिसो रबाडाने ड्रग्स घेतल्याचे निष्पन्न झाले असून, त्याचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
रबाडाने एक निवेदन प्रसिद्ध करत चाहत्यांची माफी मागितली. त्याने म्हटले, “क्रिकेट खेळण्याची संधी मी कधीच गृहीत धरत नाही. हा खेळ माझ्या आयुष्यात सर्वोच्च आहे.” रबाडाने SA20 लीग दरम्यान MI केपटाऊन संघासाठी खेळताना हे ड्रग घेतले होते. त्याने रिक्रएशनल ड्रग्ज घेतले होते.
रबाडाने आपल्या निवेदनात म्हटले की, “मी सध्या निलंबित आहे, पण या खेळात पुन्हा परतण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हा क्षण माझ्या कारकिर्दीला थांबवणारा ठरणार नाही.” तसेच त्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA), गुजरात टायटन्स, SACAsह आपली कायदेशीर टीम आणि कुटुंबीयांचेही आभार मानले.
तो पुढे म्हणाला, “मी एकटा या टप्प्यातून जाऊ शकलो नसतो. मला मिळालेला आधार आणि समजूतदारपणा माझ्यासाठी अमूल्य होता. मी पूर्वीसारखेच कठोर परिश्रम करत राहीन आणि माझ्या कलेबद्दलची निष्ठा कायम ठेवेन.”
IPL 2025 मध्ये केवळ दोन सामने
रबाडाने शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सकडून IPL 2025 मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्यात दोन विकेट्स घेतल्या. गिलने नुकतेच सांगितले होते की संघाला आशा आहे की तो पुढील 10–12 दिवसांत पुन्हा सहभागी होईल.
नोव्हेंबर 2024 मध्ये सौदी अरेबियात झालेल्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने रबाडाला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. रिपोर्टनुसार, रबाडा 6 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघात असू शकतो. तो 3 मे रोजी अहमदाबादमध्ये संघात पुन्हा सामील झाला असून, 4 मे रोजी मुंबईला जाणाऱ्या संघात त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, गुजरात टायटन्सकडून याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.