Gukesh beats Magnus Carlsen for first time in classical game | भारतीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश (D Gukesh) ने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला (Magnus Carlsen) क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत (classical chess match) पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. 19 वर्षीय भारतीय खेळाडूने अंतिम टप्प्यात उत्कृष्ट बचावात्मक खेळी करत कार्लसनला चूक करण्यास भाग पाडले आणि त्याला पहिल्यांदाच त्याला क्लालिसकल गेममध्ये हरवले.
हा पराभव कार्लसनला इतका जिव्हारी लागला की, त्याने हार स्वीकारताच टेबलावर जोरात हात मारला. पराभवानंतर त्याने केलेली आदळआपट कॅमेऱ्यात कैद झाली. तर दुसरीकडे, गुकेश भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पराभवानंतर आदळआपट करतानाचा कार्लसनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुकेशने संयम आणि जबरदस्त रणनीतीचा वापर करून कार्लसनवर निर्णायक आघाडी घेतली आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लसनला पराभूत केले.
OH MY GOD 😳🤯😲 pic.twitter.com/QSbbrvQFkE
— Norway Chess (@NorwayChess) June 1, 2025
गुकेशने यशस्वी विजय मिळविल्यानंतर कार्लसनने हस्तांदोलन करून अभिनंदन केले, पण पराभव स्वीकारणे त्याच्यासाठी नक्कीच कठीण होते.
गुकेश म्हणाला, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी हा सामना हरलो नाही. पण हो, मॅग्नसला कोणत्याही परिस्थितीत हरवणे खास असते.”
या विजयामुळे गुकेश नॉर्वे ओपनच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 8.5 गुण झाले आहेत, जो संयुक्त आघाडीवर असलेल्या कार्लसन आणि फॅबियानो कॅरुना यांच्यापेक्षा फक्त 1 गुण कमी आहे.