दिग्गजांच्या यादीत धोनीला मानाचे स्थान! ‘ICC हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, ठरला 11 वा भारतीय खेळाडू 

MS Dhoni ICC Hall of Fame

MS Dhoni ICC Hall of Fame | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) याचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे. सोमवारी (9 जून ) आयसीसीने (ICC) याची अधिकृत घोषणा केली. या प्रतिष्ठित यादीत धोनीसह ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिकेचे हाशिम आमला आणि ग्रेम स्मिथ, न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, इंग्लंडची माजी यष्टिरक्षक-फलंदाज सारा टेलर आणि पाकिस्तानचीमाजी कर्णधार सना मीर यांचाही समावेश आहे.

धोनीने भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 538 सामने खेळत 17,266 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आणि 829 जणांना बाद केले. आयसीसीने म्हटले आहे की, “धोनीची आकडेवारी केवळ फलंदाजी, यष्टिरक्षण किंवा नेतृत्वापुरती मर्यादित नसून, त्यामागे असलेल्या सातत्य, फिटनेस आणि दीर्घ कारकिर्दीचं प्रतीक आहे.”

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, “आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये आपले नाव येणे हा एक सन्मान आहे, जो विविध पिढ्यांमधील आणि जगभरातील क्रिकेटपटूंच्या योगदानाला मान्यता देतो. आपले नाव अशा महान खेळाडूंच्या यादीत असणे ही एक अद्भुत भावना आहे. हे मी कायम स्मरणात ठेवेन”

एम.एस. धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्याने संघाला 2007 टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रमवारीतही पहिलं स्थान मिळवलं. आज 43 वर्षीय धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे.

2007 मध्ये आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकासाठी धोनीला कर्णधारपद देण्याचा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातो. त्या वेळी अनेक वरिष्ठ खेळाडू संघात नव्हते आणि भारताने गट टप्प्यातूनच अपयश पत्करले होते. मात्र, धोनीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक यांसारख्या नव्या खेळाडूंनी धाडसी खेळ करत पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून ट्रॉफी जिंकली.

आयसीसी हॉल ऑफ फेमच्या यादीत स्थान मिळवणारा धोनी हा 11वा भारतीय ठरला असून, याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, बिशन सिंग बेदी, डायना एडुलजी, नीतू डेव्हिड आणि विनू मांकड यांचा समावेश करण्यात आला होता.