MS Dhoni on Retirement | चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सवर 83 धावांनी शानदार विजय मिळवत इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या हंगामाचा शेवट गोड केला. यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) त्याच्या निवृत्तीबद्दलचा नेहमीचा प्रश्न विचारण्यात आला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना, सीएसकेच्या कर्णधाराला आयपीएलमधील त्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले. यावर धोनीने मौन सोडले. या हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर धोनीच्या पुढील हंगामात परतणार की नाही, याविषयी बरीच चर्चा रंगली होती.
दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बाहेर झाल्यानंतर धोनीने बहुतेक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. मात्र, रविवारी विजय मिळवूनही सीएसके गुणतालिकेत तळाशी राहिली. धोनी म्हणाला की त्याच्याकडे निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी ‘4-5 महिने’ आहेत, पण तो पुढील हंगामात परत येणार आहे की नाही, हे त्याने स्पष्टपणे सांगितले नाही.
निवृत्तीच्या प्रश्नावर बोलताना धोनी म्हणाला, ” आमचा हा हंगाम चांगला गेला नाही, पण हा एक परिपूर्ण खेळ होता. आम्ही चांगली कॅचिंग केली नाही, पण आज ती चांगली झाली. हे अवलंबून आहे. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 4-5महिने आहेत, घाई नाही. शरीर फिट ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम स्थितीत राहावे लागेल. जर खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीमुळे निवृत्ती घ्यायला सुरुवात केली, तर काही जण 22 व्या वर्षीच निवृत्त होतील.”
“रांचीला परत जाईन, काही बाईक राईडचा आनंद घेईन. मी खेळणार नाही, असे म्हणत नाही आणि परत येत आहे, असेही म्हणत नाही. माझ्याकडे वेळ आहे. विचार करेन आणि मग निर्णय घेईन. जेव्हा आम्ही हंगामाला सुरुवात केली, तेव्हा पहिले चार सामने चेन्नईमध्ये होते. आम्ही दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण मला वाटले की विकेट पहिल्या डावात फलंदाजीसाठी चांगली होती. मला फलंदाजीची चिंता होती.”
“आम्ही धावा करू शकतो, पण काही त्रुटी भरायच्या आहेत. ऋतुराजला पुढील हंगामात जास्त काळजी करण्याची गरज नाही. तो त्यापैकी एका भूमिकेत फिट होईल. तो माझ्यापेक्षा बरोबर 25 वर्षांनी लहान आहे, ज्यामुळे मला स्वतःचं वय जाणवतं,” असे धोनी सामन्यानंतर बोलताना म्हणाला.
दरम्यान, सीएसकेने निराशाजनक हंगामाचा शेवट मोठ्या विजयाने केला असला तरी, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिले. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सलामीचा सामना जिंकल्यानंतर, सीएसकेची गाडी रुळावरून घसरली आणि त्यानंतरच्या 13 सामन्यांत त्यांना केवळ 3 विजय मिळवता आले, ज्यामुळे त्यांचे या हंगामात 8 गुण आहेत.