Neeraj Chopra : नीरज चोप्राचे दमदार पुनरागमन, पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत पॅरिस डायमंड लीग जिंकली

Neeraj Chopra Wins Paris Diamond League

Neeraj Chopra Wins Paris Diamond League | भारताचा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी (20 जून ) पॅरिस डायमंड लीगमध्ये आपले 2025 वर्षातील पहिले विजेतेपद पटकावले. जागतिक स्तरावर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटर लांब भालाफेक करून आघाडी घेतली. मध्य फेऱ्यांमध्ये तीन ‘नो-मार्क्स’ असले तरी त्याची पहिली फेक स्पर्धेत निर्णायक ठरली.

नीरजने पहिल्या फेरीत 88.16 मीटर भालाफेक करून सर्वांना थक्क केले. जर्मनीचा ज्युलियन वेबर 87.88 मीटरच्या फेकीसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर ब्राझीलच्या मॉरिसिओ लुईझ दा सिल्वाने 86.62 मीटर फेकून तिसरे स्थान मिळवले. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट 81.66 मीटरसह मागे राहिला.

दुसऱ्या फेरीत वेबरने 86.20 मीटर आणि नीरजने 85.10 मीटर फेक केली. तिसऱ्या फेरीत दा सिल्वाने 86.62 मीटर फेकून आपले स्थान पक्के केले. वेबरने चौथ्या आणि पाचव्या फेरीत अनुक्रमे 83.13 आणि 84.50 मीटर फेकीसह आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण नीरजच्या 88.16 मीटरच्या फेरीला कोणीही भेदू शकले नाही. अंतिम फेरीत नीरजने 82.89 मीटर फेक करत आपले वर्चस्व कायम ठेवले.

नीरजचा विजयी प्रवास

नीरजने यापूर्वी जून 2023 मध्ये लॉझेन डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर फेकून विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर सहा डायमंड लीग स्पर्धांमध्ये त्याने उपविजेतेपद पटकावले. पॅरिसमधील या विजयाने त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. मध्य फेऱ्यांमध्ये काही अडथळे आले, पण पहिल्या फेरीतील वैध फेक त्याला विजयापर्यंत घेऊन गेली.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज आता 5 जुलै 2025 रोजी होणाऱ्या पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा मूळतः 24 मे रोजी होणार होती, पण भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. या स्पर्धेतही नीरजकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.