AI बुद्धिबळ स्पर्धेत OpenAI आणि Grok आमने-सामने; कोण ठरले विजयी?

ChatGPT vs Grok AI Chess Tournament

ChatGPT vs Grok AI Chess Tournament: एआय आधारित चॅटबॉटचा वापर प्रचंड वाढला आहे. कोणतीही माहिती जाणून घेण्यापासून ते फोटो तयार करण्यापर्यंत अनेक कामे एआय करते. विचार करा दोन एआयमध्येच बुद्धिबळाचा सामना रंगला तर?

नुकतेच, गुगलच्या ‘कॅगल एआय एक्झिबिशन टुर्नामेंट’मध्ये (Kaggle AI Exhibition Tournament) ओपनएआयच्या (OpenAI) ‘ओ3’ या लार्ज लँग्वेज मॉडेलने इलॉन मस्क यांच्या (Elon Musk) ‘ग्रोक 4’ (Grok 4) ला 4-0 ने हरवून विजेतेपद पटकावले आहे.

5 ते 7 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अनेक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी भाग घेतला होता, पण अंतिम फेरीत ओपनएआयने बाजी मारली.

अंतिम सामन्यात ‘ग्रोक’ने अनेक चुका केल्या. त्यात वारंवार ‘राणी’ गमावण्याचाही समावेश होता. याउलट, ओपनएआयच्या मॉडेलने 12 सामन्यांमध्ये सरासरी 91 टक्क्यांपेक्षा जास्त अचूकता दर्शवली.

ओपनएआयने ग्रोकला पूर्णपणे हरवले

चेस.कॉमचे लेखक पेड्रो पिन्हाटा यांनी सांगितले की, “उपांत्य फेरीपर्यंत ग्रोक 4 ला कोणीही रोखू शकणार नाही, असे वाटत होते. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी हा भ्रम तुटला.” ते पुढे म्हणाले की, ‘ओ3’ ने ‘ग्रोक’ला 4-0 ने सहज हरवून विजयावर शिक्कामोर्तब केले. ग्रोकचा खेळ पूर्णपणे वेगळा आणि चुकांनी भरलेला होता.

या स्पर्धेत गुगलचे ‘जेमिनी’ (Gemini) मॉडेल तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्याने दुसऱ्या एका ओपनएआय मॉडेलला 3.5-0.5 अशा फरकाने हरवले.

एआय बुद्धिबळ स्पर्धा का घेतल्या जातात?

अशा स्पर्धा तंत्रज्ञान कंपन्यांकडून त्यांच्या मॉडेल्सची विविध क्षेत्रांतील क्षमता तपासण्यासाठी आयोजित केल्या जातात. ‘तर्क’ आणि ‘कोडिंग’ अशा कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात.

बुद्धिबळ आणि ‘गो’ सारखे जटिल आणि नियमांवर आधारित खेळ मॉडेल्सला दिलेले उद्दिष्ट किती प्रभावीपणे पूर्ण करता येते, हे पाहण्यासाठी उत्तम मानले जातात. स्पर्धेत अँथ्रोपिक, गुगल, ओपनएआय, एक्सएआय, तसेच चिनी डेव्हलपर्स ‘डीपसीक’ (DeepSeek) आणि ‘मूनशॉट एआय’ (Moonshot AI) यांसारख्या कंपन्यांनी भाग घेतला होता.