IPL 2025, CSK vs PBKS | पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) युवा फलंदाज प्रियांश आर्यने (Priyansh Arya) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) आपल्या केवळ चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध अविश्वसनीय खेळी करत वादळी शतक झळकावले. आपल्या पहिल्याच IPL सामन्यात पंजाबसाठी जलद ४७ धावांची खेळी करणाऱ्या प्रियांशने चॅम्पियन चेन्नईविरुद्ध तुफान फटकेबाजी केली. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या डावखुऱ्या फलंदाजाने केवळ ३९ चेंडूत शतक पूर्ण करताना नऊ उत्तुंग षटकार आणि सात चौकार मारले. १३ व्या षटकात त्याने अनुभवी गोलंदाज मथीशा पाथिरानाला अक्षरशः धुतले आणि २२ धावा करत आपले शतक साजरे केले. अखेरीस नूर अहमदने त्याला १०३ धावांवर (४२ चेंडू) बाद केले.
प्रियांशचे हे शतक IPL मधील कोणत्याही भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. यापूर्वी, २००९ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना युसूफ पठाणने (Yusuf Pathan) मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत सर्वात वेगवान शतक ठोकले होते.
कोण आहे प्रियांश आर्य? (Who is Priyansh Arya?)
दिल्लीचा आक्रमक सलामीवीर प्रियांश आर्य याला पंजाब किंग्जने मेगा ऑक्शनमध्ये ३.८ कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले. प्रियांशने पहिल्या दिल्ली प्रीमियर लीग (DPL) स्पर्धेत साउथ दिल्ली सुपरस्टारझ संघासाठी दहा डावांमध्ये सर्वाधिक ६०८ धावा केल्या होत्या.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये प्रियांशने एका षटकात सहा षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही प्रियांश दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने सात डावांमध्ये ३१.७१ च्या सरासरीने आणि १६६.९१ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने २२२ धावा केल्या होत्या. IPL २०२४ च्या लिलावासाठी त्याची निवड झाली होती, तरीही तो त्यावेळी विकला गेला नव्हता.
IPL २०२४ च्या लिलावात निवड न झाल्याबद्दल बोलताना प्रियांश म्हणाला होता, “निवड न झाल्याने मला वाईट वाटले होते. यावर्षीही माझ्याकडून लिलावात खूप अपेक्षा होत्या, पण मी त्याबद्दल विचार करत नव्हतो आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० सामन्यांवर लक्ष केंद्रित केले होते. पंजाब किंग्जने निवडल्यानंतर मला खूप आनंद झाला, पण मी जास्त सेलिब्रेशन केले नाही कारण माझे लक्ष स्पर्धेवरच होते. मी लवकरच नक्कीच सेलिब्रेशन करेन.”