‘आरसीबी’ची खरंच 17 हजार कोटींना विक्री होणार का? संघाच्या मालकी कंपनीने दिले स्पष्टीकरण

RCB Sale Rumours

RCB Sale Rumours | रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (Royal Challengers Bengaluru) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावल्यानंतर सध्या चर्चेत आहेत. पंजाब किंग्सला हरवून आरसीबीने हा ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर आयोजित कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरबीसीची मालकी कंपनी संघाची विक्री करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

आरसीबीचे मालक हा क्लब सुमारे 2 अब्ज डॉलरला विकण्याचा विचार करत असल्याच्या जोरदार अफवा पसरल्या होत्या. या अफवांवर संघाची मालकी कंपनी युनायटेड स्पिरिट्सनेतातडीने स्पष्टीकरण देत, असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बीएसईला (BSE) दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये युनायटेड स्पिरिट्सने म्हटले आहे की, मीडिया रिपोर्ट्स केवळ शक्यतांवर आधारित आहेत आणि आरसीबीची हिस्सेदारी विकण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. “आरसीबीच्या संभाव्य हिस्सेदारी विक्रीसंबंधी मीडिया रिपोर्ट्सवर कंपनीकडून स्पष्टीकरण मागणाऱ्या 10 जून 2025 रोजीच्या तुमच्या ईमेल संवादाचा संदर्भ देत, कंपनी हे स्पष्ट करू इच्छिते की वरील मीडिया रिपोर्ट्स केवळ अटकळी स्वरूपाचे आहेत आणि कंपनी अशी कोणतीही चर्चा करत नाहीये,” असे युनायटेड स्पिरिट्सने सांगितले.

या स्पष्टीकरणापूर्वी काही रिपोर्टमध्ये म्हटले होते की, डिआयजिओ आरसीबी फ्रँचायझीचा काही भाग किंवा पूर्ण भाग विकण्यासाठी सल्लागारांशी बोलणी करत आहे आणि यासाठी 17,000 कोटींपर्यंत मूल्यांकन अपेक्षित आहे. कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि डिआयजिओ शेवटी विक्री न करण्याचा निर्णयही घेऊ शकते.

दरम्यान, आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेला आरसीबी संघ मूळतः विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांनी विकत घेतला होता. 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स बंद पडल्यानंतर, मल्ल्याचा व्यवसाय डिआयजिओने विकत घेतल्यानंतर त्यांनी संघाचे नियंत्रण हाती घेतले. या हंगामात आरसीबीने एक ऐतिहासिक करत चुरशीच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला सहा धावांनी हरवून आपले पहिले-वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.