Rinku Singh To Get Engaged To Politician Priya Saroj | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग (Rinku Singh) आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या साखरपुडा आणि लग्नाची तारीख समोर आली आहे.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा 8 जून 2025 रोजी लखनौमध्ये (Lucknow) एका भव्य समारंभात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रिपोर्ट नुसार, 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये दोघांचे लग्न होणार आहे.
रिंकूने आयपीएल 2025 (IPL 2025) मधील कोलकाता नाईट रायडर्सच्या यशस्वी हंगामानंतर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या साखरपुड्याविषयी सोशल मीडियावर सातत्याने चर्चा सुरू होती. आता याबाबतची तारीख समोर आली आहे.
प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज (Tufani Saroj) हे समाजवादी पक्षाचे आमदार असून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच रिंकू आणि प्रियाच्या नात्याला दुजोरा दिला होता. त्यांनी एएनआय (ANI) ला सांगितले होते की, दोघांनी आपल्या कुटुंबीयांची संमती घेतली असून, लग्नाच्या तयारीसाठी प्राथमिक बोलणी सुरू आहेत.
रिंकू सिंग भारतीय टी20 (T20I) संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याने 30 टी20 सामन्यांत 507 धावा केल्या आहेत. त्याचा सरासरी 46.09 आणि स्ट्राईक रेट 165.14 आहे. त्याने 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी20 पदार्पण केले.
याशिवाय, त्याने भारतासाठी 2 एकदिवसीय सामने खेळले असून, त्याची लिस्ट-ए क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी आहे. 5,899 धावा, 1 शतक आणि 17 अर्धशतक हे त्याच्या फलंदाजीचे ठळक आकडे आहेत.
तर दुसरीकडे 26 वर्षीय खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांनी बीपी सरोज (BP Saroj) यांचा 35,850 मतांनी पराभव केला होता.त्या दिल्ली विद्यापीठ (Delhi University) मधून कला शाखेत पदवीधर झाल्या असून, त्यानंतर एमिटी विद्यापीठमधून एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आहे.