Lionel Messi India Tour : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या ‘जी.ओ.ए.टी. इंडिया टूर’ अंतर्गत भारत दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि हैदराबादला भेट दिल्यानंतर, 14 डिसेंबर (रविवार) रोजी तो मुंबईत दाखल झाला. मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या ऐतिहासिक स्टेडियममध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सी यांची पहिल्यांदाच भेट झाली. दोन्ही खेळातील दिग्गजांना एकाच मंचावर पाहण्यासाठी चाहते आतुर होते. हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासातील एक गौरवशाली क्षण ठरला.
जर्सी आणि फुटबॉलची देवाणघेवाण
या भेटीदरम्यान, सचिन तेंडुलकरने आपल्या स्वाक्षरीसह 10 नंबरची भारतीय संघाची जर्सी मेस्सीला भेट म्हणून दिली. मेस्सीनेही त्याबदल्यात सचिनला फुटबॉल भेट देत या ऐतिहासिक क्षणाला खास रंगत आणली. सचिन तेंडुलकर मैदानात येताच संपूर्ण स्टेडियम पुन्हा एकदा “सचिन… सचिन…” च्या घोषणांनी दुमदुमून गेले. हे चाहत्यांचे प्रेम पाहून मेस्सीही काही काळ शांतपणे ते दृश्य पाहत होता. मेस्सीसोबत त्याचे इंटर मियामी मधील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल देखील उपस्थित होते.
सुनील छेत्रीची भेट आणि प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्री यांचीही उपस्थिती होती. वानखेडे स्टेडियममध्ये सेलिब्रिटींचा सामना सुरू असताना, मेस्सी आणि छेत्रीने एकमेकांना मिठी मारून भेट घेतली. छेत्रीने यावेळी मेस्सीसोबत सेल्फीही काढला, तर मेस्सीने त्याला स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीसोबत ‘प्रोजेक्ट महादेवा’ नावाच्या राज्याच्या तळागाळातील फुटबॉल प्रकल्पाचा शुभारंभ केला. मेस्सी आणि त्याच्या साथीदारांनी या प्रकल्पातील महिला फुटबॉलपटूंशीही मैदानात काही वेळ संवाद साधला. फडणवीस यांनी मेस्सीला विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी या मैदानावर अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे आणि इथे असंख्य स्वप्नं पूर्ण झाली आहेत. तुमच्या पाठिंब्याशिवाय 2011 साली या मैदानावर ते क्रिकेट विश्वचषक विजयाचे सुवर्णक्षण पाहणे शक्य झाले नसते.”
मेस्सीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मेस्सीच्या खेळाविषयी बोलण्यासाठी हा मंचही अपुरा आहे. कारण त्यांनी खेळात सगळं काही मिळवलं आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्धतेची आपण मनापासून प्रशंसा करतो. या तिन्ही दिग्गज खेळाडूंचे इथे असणे हा मुंबई आणि संपूर्ण भारतासाठी सुवर्ण क्षण आहे.”









