Ind vs Pak Asia Cup 2025: नुकतेच आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ (Ind vs Pak Asia Cup 2025) आमनेसामने येणार आहेत. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळण्याचा निर्णय घेतल्याने यावर टीका होत आहे.
भारताने पाकिस्तानसोबत (Ind vs Pak Asia Cup 2025) कोणतीही स्पर्धा खेळू नये, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने खेळ थांबायला नको, क्रिकेट सुरू राहायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.
पहलगाम येथे झालेल्या अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. मात्र भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”खेळ थांबायला नको. अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. क्रिकेट चालूच राहिले पाहिजे.”, असे मत त्याने व्यक्त केले आहे.
9 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळले जाणार सामने
2025 आशिया कप स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान युनायटेड अरब एमिराट्समध्ये खेळवली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी युएई संघाविरुद्ध होईल. स्पर्धेतील गट ‘अ’ मध्ये भारतासोबत पाकिस्तान, युएई आणि ओमान यांचा समावेश आहे. गट ‘ब’ मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत.
भारत-पाकिस्तान सामना पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकाच गटात आहे. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये या दोन संघांमधील बहुप्रतिक्षित सामना होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, सुपर फोर टप्प्यातही या दोन संघांमध्ये सामना निश्चित आहे. याशिवाय, जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर या स्पर्धेत ते तिसऱ्यांदा आमनेसामने येऊ शकतात. त्यामुळे चाहत्यांना एकाच स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे तीन सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.
सामने युएईतच का?
या स्पर्धेचे अधिकृत यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे असूनही भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणावामुळे 2027 पर्यंत सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळण्याचे दोन्ही देशांमध्ये आधीच निश्चित झाले आहेत. त्यानुसार हे सामने युएईमध्ये आयोजित केले जात आहेत.