लंडन– लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आज चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने (South Africa)५ गडी राखत जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर प्रथमच आयसीसीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गतविजेता ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र ते सलामीवीर फलंदाज मर्करामच्या १३८ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ८३.४ षटकांत गाठून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी उचलली. ऑस्ट्रेलियाचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ १३८ धावाच उभारु शकला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली होती. मग ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी २०७ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान मिळाले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात धक्कादायक झाली. रियान रिकेल्टन फक्त ६ धावा करू शकला. मिशेल स्टार्कने त्याला बाद केले. वियान मुल्डरनेही फक्त २७ धावा केल्या. त्याला स्टार्कनेच पॅव्हिलियनमध्ये पाठवले. ७० धावांवर दोन गडी गमावलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला मोठ्या भागीदारीची गरज होती.त्यानंतर एडन मार्करमने टेंबा बावुमासोबत शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला.काल तिसर्या दिवसाअखेर या दोन्ही फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २ बाद २१३ वर पोहोचवली होती. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावांची गरज होती. आज खेळ सुरू होताच टेंबा बावुमा ६६ धावा करून बाद झाला. मात्र दुसर्या बाजूने मार्करम संयमी खेळी करत होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्याला बाद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी ५ धावांची गरज असताना हेझलवुडने त्याला बाद केले. त्यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम आणि काइल व्हेरेन या जोडीने दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ५ बाद २८२ वर नेली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ठसा उमटवला.