WTC 2025 Final Prize Money | लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘प्रोटीज’ संघाने आपले पहिले आयसीसी विश्वविजेतेपद पटकावले. चौथ्या डावात 282 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेने धैर्य विजयाचा पाया रचला.
या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे. केवळ दक्षिण आफ्रिकेच नाही तर ऑस्ट्रेलियाला देखील बक्षीस रक्कम मिळाली आहे.
आयसीसीने यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. विजेत्या दक्षिण आफ्रिकेला 3.6 दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹30 कोटी), तर उपविजेत्या ऑस्ट्रेलियाला 2.1 दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹17.5 कोटी) मिळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे.
27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने पटकावले आयसीसी विजेतेपद
चार दिवस चाललेला हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. पहिल्या दिवशी कागिसो रबाडाच्या पाच विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 28 धावांत 6 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 138 धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कच्या 50 धावांच्या झुंजार खेळीने ऑस्ट्रेलियाला 207 धावांपर्यंत नेले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य उभे राहिले.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा हिरो ठरला एडन मार्करम. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या मार्करमने दुसऱ्या डावात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, टेम्बा बावुमाने स्नायूंच्या वेदना असूनही 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजयाचा पाठलाग मजबूत केला. या दोघांमधील 143 धावांच्या भागीदारीने सामन्याचा रंग बदलला. चौथ्या दिवसाच्या सकाळी काइल व्हेरेईनने विजयी धावा काढत दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय निश्चित केला.
1998 च्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफीनंतर दक्षिण आफ्रिकेचे हे पहिलेच जागतिक विजेतेपद आहे. दशकांच्या निराशेनंतर हा विजय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी पुनरुत्थानाचा क्षण ठरला. ऑस्ट्रेलियाचा हा 15 वर्षांतील आयसीसी फायनलमधील पहिला पराभव आहे, ज्यामुळे या विजयाचे महत्त्व आणखी वाढले.