मुंबई– आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू हे देशाची शान असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते देशाची मान उंचावत असतात. या खेळाडूंना जपण्यासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनातर्फे अनेक योजना आखल्या जात असतात. मात्र खेळाडूंच्या कामगिरीचे श्रेय घेणारे राज्यकर्ते या खेळाडूंच्या चरितार्थाचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत (international shooter Rahi Sarnobat)हिच्या उदाहरणावरुन स्पष्ट झाले आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होऊनही गेल्या आठ महिन्यांपासून राही सरनोबतला पगार दिला नाही. तिला आता न्याय कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज (international shooter)राही सरनोबत हिने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. त्याबद्दल २०१४ साली तत्कालीन सरकारने तिची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली. सुरुवातीला तीन वर्षे तिला वेळेवर पगार येत (regular salary)होता. त्यानंतर मात्र प्रशिक्षण पूर्ण न केल्याचे कारण सांगत तिचा पगार बंद करण्यात आला. वास्तविक भारतीय संघात असल्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी वेळ मिळाला नाही. मात्र शासनाने ही बाब गृहित धरली नाही. सध्या ती आर्थिक विवंचनेत असून तिला भविष्याविषयीही काही योजना आखता येत नाहीत. गेल्या आठ वर्षात तिने व तिच्या कुटुंबाने विविध पातळीवर दाद मागितली असली तरीही तिला न्याय देण्यात आलेला नाही. खाजगी आस्थापना आपल्या खेळाडू कोट्यातून नोकरी दिलेल्या खेळाडूंना व कलाकारांना चांगली वागणूक देत असताना सरकारी पातळीवर मात्र अशा खेळाडूंना जपण्याचे कोणतेही धोरण नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केल्यास तिच्या घरी जाऊन अभिनंदन करुन फोटो काढून घेणारे राजकीय नेते अशा प्रश्नात दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.