Home / क्रीडा / ‘आम्ही कुणालाही…’; विराट-रोहितच्या निवृत्तीबद्दल बीसीसीआयचे मोठे विधान

‘आम्ही कुणालाही…’; विराट-रोहितच्या निवृत्तीबद्दल बीसीसीआयचे मोठे विधान

Virat Kohli Rohit Sharma Retirement

Virat Kohli Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्यांनी याआधीच टी-20आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका असू शकते. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

सध्या हे दोन्ही खेळाडू ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहेत. या मालिकेतील सामने पर्थ, ॲडलेड आणि सिडनी येथे अनुक्रमे 19, 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी खेळले जातील.

BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे स्पष्टीकरण

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत या चर्चांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना दोघांसाठी निरोपाची मालिका आयोजित करण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “त्यांनी निवृत्ती कधी घेतली? विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही एकदिवसीय सामने खेळत आहेत. जर ते खेळत असतील, तर तुम्हाला निरोपाची मालिका का हवी आहे?

त्यांनी दोन फॉरमॅटमधून टप्प्याटप्प्याने निवृत्ती घेतली आहे, पण ते वनडे खेळत आहेत, बरोबर? त्यामुळे याबद्दल जास्त काळजी करू नका.”, असे ते म्हणाले.

राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे धोरण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगत नाही. तो निर्णय खेळाडू स्वतः घेतो आणि आम्ही त्याचा आदर करतो. विराट कोहली खूप तंदुरुस्त आहे आणि रोहित शर्मा खूप चांगला खेळत आहे. मग तुम्हाला त्यांच्या निरोपाची चिंता का वाटते?”

दरम्यान काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2027 च्या विश्वचषकासाठी बीसीसीआय युवा खेळाडूंची नवी टीम तयार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्मा विश्वचषकाआधी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.


हे देखील वाचा –

5 वर्षांनंतर TikTok ची भारतात होणार एन्ट्री? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण

‘आधार कार्ड’चा पुरावा ग्राह्य धरावा’, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना मोठा दिलासा