घिबली पाठोपाठ व्हायरल झालेला हा नवीन ‘AI डॉल ट्रेंड’ काय आहे? जाणून घ्या

ChatGPT Box Doll Trend | सोशल मीडियावर सध्या एक विचित्र पण मजेशीर ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. ChatGPT आणि AI इमेज टूल्स वापरून लोक स्वतःचे फोटो खेळण्यांच्या बॉक्समध्ये पॅक केलेल्या बाहुल्यांसारखे बनवत आहेत. या ‘AI डॉल ट्रेंड’मुळे सामान्य सेल्फी आता सुपरहिरो, योद्धा किंवा विज्ञानकाल्पनिक पात्रांसारखे वाटू लागले आहेत.

या फोटोंमध्ये “Collectible Edition” किंवा “Hero Mode Activated” असे मजकूर, गॉगल्स, हेल्मेट, जेटपॅकसारख्या ॲक्सेसरीज असतात. हे फोटो पाहताना अगदी 90 च्या दशकातील खेळण्यांची आठवण येते.

ChatGPT वापरून हे कसं तयार केलं जातं?

यूजर्स ChatGPT Plus किंवा Pro प्लॅनमध्ये फोटो जनरेट करणारा पर्याय वापरतात. तेव्हा एक प्रॉम्प्ट लिहावा लागतो, जसं की – “माझं चित्र अंतराळवीरासारखं तयार करा. बॉक्समध्ये ठेवा. हेल्मेट, जेटपॅक द्या. पार्श्वभूमीला तारे दाखवा.” आपला मूळ फोटो अपलोड करून हेअरस्टाईल किंवा कपडे जसेच्या तसे ठेवायला सांगता येते. फोटो पूर्ण झाल्यावर त्यात नाव, लोगो किंवा पॉवर रेटिंगही देता येते.

हा ट्रेंड TikTok वर #BarbieBoxChallenge या हॅशटॅगसह सुरू झाला आणि काही आठवड्यांतच इंस्टाग्राम, X आणि इतर प्लॅटफॉर्मवर पसरला.

मजेशीर फोटो पण गोपनीयतेचं काय?

घिबली पाठोपाठ आता ‘AI डॉल ट्रेंड’ चर्चेत आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी याबाबत धोका (AI Privacy Issues) व्यक्त केला आहे. यूजर्स AI टूल्सना आपले फोटो आणि वैयक्तिक माहिती देत आहेत. ही माहिती पुढे कुठे वापरली जाईल, कोण ठेवणार, याची काही खात्री नसते. काही वेळा ही डेटा कंपन्यांच्या ट्रेनिंगसाठी वापरली जाऊ शकते, असाही इशारा आहे.

AI फोटो तयार करणारे मोठे सर्व्हर दिवस-रात्र चालू असतात. यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे असे ट्रेंड वाढल्यास पर्यावरणावरही परिणाम होतो, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.