India e-Passport : आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या क्षेत्रात भारताने एक मोठे तांत्रिक पाऊल उचलले असून नागरिकांचा परदेश प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन ई-पासपोर्ट लाँच केला आहे. केंद्र सरकारच्या पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0 अंतर्गत ही प्रगत प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
या नवीन पासपोर्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेली इलेक्ट्रॉनिक चिप, जी प्रवाशांची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती अत्यंत सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. यामुळे पासपोर्टमधील छेडछाड किंवा बनावटगिरी रोखणे आता शक्य होणार आहे.
आता जे नागरिक नवीन पासपोर्टसाठी अर्ज करतील किंवा जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करतील, त्यांना आपोआपच हा नवीन ई-पासपोर्ट दिला जाईल. ज्यांच्याकडे सध्या जुना आणि नियमित पासपोर्ट आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांची पासपोर्टची मुदत संपेपर्यंत तो पूर्वीप्रमाणेच वैध राहणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या सुविधेद्वारे जागतिक स्तरावर भारतीय प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे नेमके काय?
हा एक प्रकारचा हायब्रीड पासपोर्ट आहे, ज्यामध्ये कागदी माहितीसोबतच इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर केला जातो. दिसायला हा जुन्या पासपोर्टसारखाच असला, तरी त्याच्या कव्हरवर अशोक स्तंभाच्या खाली एक खास इलेक्ट्रॉनिक चिन्ह दिसेल. याच्या आत एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि एक अँटेना बसवण्यात आला आहे. या चिपमध्ये पासपोर्ट धारकाचा फोटो, बोटांचे ठसे आणि इतर महत्त्वाची माहिती डिजिटल स्वरूपात साठवलेली असते.
या नवीन प्रणालीचे फायदे
ई-पासपोर्टचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षेचा दर्जा. यामध्ये माहिती डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी केलेली असल्यामुळे जगभरातील इमिग्रेशन अधिकारी त्याची सत्यता लगेच तपासू शकतात. यामुळे विमानतळावर होणारी तपासणी प्रक्रिया अधिक वेगवान होईल. तसेच, यातील चिपशी छेडछाड करणे जवळपास अशक्य असल्याने बनावट पासपोर्ट तयार करणाऱ्या टोळ्यांना लगाम बसेल.
अर्ज करण्याची पद्धत आणि नियम
जुन्या पासपोर्ट धारकांना त्यांचा पासपोर्ट खराब झाल्याशिवाय किंवा पाने संपल्याशिवाय तो बदलण्याची सक्ती नाही. जेव्हा संबंधित पासपोर्ट कार्यालय तांत्रिकदृष्ट्या सज्ज होईल, तेव्हा तिथल्या अर्जदारांना आपोआपच ई-पासपोर्ट मिळण्यास सुरुवात होईल. यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया किंवा जास्तीची कागदपत्रे देण्याची गरज नाही.
ऑनलाइन अर्जासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:
- सर्वप्रथम पासपोर्ट सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- स्वतःचा युजर आयडी तयार करून नोंदणी करा आणि जवळचे प्रादेशिक कार्यालय निवडा.
- लॉग-इन केल्यानंतर नवीन पासपोर्ट किंवा नूतनीकरणाचा पर्याय निवडा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा.
- फी भरल्यानंतर तुमच्या सोयीनुसार भेटीची वेळ निश्चित करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएसद्वारे पोचपावती आणि पुढील माहिती दिली जाईल.
हे देखील वाचा – BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची मोठी रणनीती; काँग्रेसची साथ सोडून ‘या’ पक्षासोबत जाणार?








