MPSC Group B Exam 2025: एमपीएससीची बंपर भरती! 282 गट ब अराजपत्रित पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध, वाचा संपूर्ण माहिती

MPSC Group B Exam 2025

MPSC Group B Exam 2025: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या (MPSC Vacancy 2025) तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य शासनाच्या विविध विभागांमधील गट ब अराजपत्रित सेवांसाठीच्या (Maharashtra Group B Exam 2025) पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 282 पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

भरतीचा तपशील

गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत राज्य कर निरीक्षक या पदाच्या 279 जागा आणि सहायक कक्ष अधिकारी या पदाच्या 3 जागा भरण्यात येणार आहेत. भविष्यात इतर पदांचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश केला जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. परीक्षा राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट आहे. उमेदवारांना एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून प्रोफाइल तयार करणे किंवा अद्ययावत करणे आवश्यक आहे.

अधिक पदांचा समावेश शक्य

आयोगाने स्पष्ट केले आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत इतर काही संवर्गातील पदांचा या भरतीत समावेश होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागांकडून येणाऱ्या अतिरिक्त मागण्यांच्या आधारे ही पदसंख्या वाढू शकते.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी संभाव्य बदल लक्षात घेऊन अर्ज करावा, कारण जाहिरातीत उल्लेख नसलेली पदसंख्या नंतर समाविष्ट होऊ शकते. त्यामुळे, जाहिरातीत समावेश नसल्याचे कारण देत अर्ज न करण्याचा निर्णय घेतल्यास, नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून, त्यामध्ये पूर्व परीक्षा व त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना पूर्व परीक्षेत किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक राहील.