Home / लेख / गूगल करणार Chrome ची विक्री? सर्वात लोकप्रिय ब्राउजर खरेदीसाठी Perplexity ने दिली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची ऑफर

गूगल करणार Chrome ची विक्री? सर्वात लोकप्रिय ब्राउजर खरेदीसाठी Perplexity ने दिली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची ऑफर

Perplexity Google Chrome bid

Perplexity Google Chrome bid: गूगल क्रोम (Google Chrome) हा सर्वात लोकप्रिय वेब ब्राउजर आहे. स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपर्यंत सर्वच डिव्हाइसमध्ये या वेब ब्राउजरचा सर्वाधिक वापर केला जातो. आता या ब्राउजरला खरेदी करण्यासाठी एआय कंपनी Perplexity ने ऑफर दिली आहे.

Perplexity ने Google Chrome खरेदी करण्यासाठी 34.5 अब्ज डॉलरची (सुमारे ₹2.88 लाख कोटी) ऑफर दिली आहे. सध्या Perplexity चे मूल्यांकन सुमारे 18 अब्ज डॉलर आहे. ब्राउझर मार्केटमध्ये विस्तार करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा हा भाग असल्याचे म्हटले आहे.

गुगलने क्रोम (Chrome) विकण्याची कोणतीही तयारी दाखवलेली नाही, तसेच न्यायालयीन आदेशानेही त्यांना असे करण्यास भाग पाडले नाही. या वर्षी Perplexity ने टिकटॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशन्स खरेदी करण्याचा देखील प्रयत्न केला होता.

Perplexity चे मुख्य व्यवसाय अधिकारी दिमित्री शेवेलेंको यांनी सांगितले की, ‘अनेक मोठ्या गुंतवणूक निधींनी या डीलसाठी पूर्ण निधी पुरवण्यास सहमती दर्शविली आहे.’ कंपनीने क्रोम आणि त्याच्या ‘क्रोमियम’ बेसमध्ये खरेदीनंतर दोन वर्षांत $3 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, क्रोमच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना देखील कामावर कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

या ऑफरमध्ये Perplexity ने ‘अँटीट्रस्ट’पासून वाचण्यासाठी स्वतःची कोणतीही इक्विटी समाविष्ट केलेली नाही. सध्या अनेक एआय कंपन्या व्हर्च्युअल एजंट्सना वेब ब्राउजर्समध्ये एकत्रित करण्याच्या संधी शोधत आहेत. Perplexity स्वतःच ‘कॉमेट’ (Comet) नावाचा एक एआय-आधारित ब्राउझर विकसित करत आहे, जो ऑनलाइन शॉपिंगसारखी कामे आपोआप हाताळू शकतो. दरम्यान, गुगलकडून अद्याप Perplexity च्या या ऑफरवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.