पुणे- पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या कॉल सेंटरवरून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून डिजिटल अटक करण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात होते. या कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकत मोठे सायबर फसवणूक रॅकेट उघडकीस आणले आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत ९ व्या मजल्यावर मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी या नावाचे कॉल सेंटर चालविले जात असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांना मिळाली. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत १०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले . ५ आरोपींना अटक करण्यात आली. २ आरोपी फरार आहेत.
या कॉल सेंटरमध्ये २०० कर्मचारी काम करत होते. त्यातील बहुतांश कर्मचारी गुजरातमधील आहेत. मुख्य आरोपी हा गुजरातचा असल्याचा संशय आहे.
याबाबत पुणे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली की मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाचे हे कॉल सेंटर अमेरिकेतील लोकांना फसवत आहे . ही एक मोठी सायबर फसवणूक आहे. खराडी परिसरात मध्यरात्री गुन्हे शाखेने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी उपस्थित होते. यात १११ पुरुष आणि १२ महिला होत्या. कारवाईत ४१ मोबाईल फोन आणि ६१ लॅपटॉप जप्त करण्यात आले. या कॉल सेंटरमधून दररोज १ लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवला जात होता.