Samsung Foldable Phones: सॅमसंगच्या ‘या’ फोल्डेबल स्मार्टफोनने भारतीयांना लावले वेड, 48 तासांत 2.1 लाख प्री-बुकिंग

Samsung Foldable Phones

Samsung Foldable Phones: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सला (Samsung Foldable Phones) भारतीय बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Samsung Galaxy Z Fold7 आणि Samsung Z Flip7 हे फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. सॅमसंगच्या नवीन सातव्या जनरेशनच्या फोल्डेबल स्मार्टफोन सीरिजच्या लाँचनंतर 48 तासांच्या आत त्यांना 2.1 लाख प्री-बुकिंग मिळाल्या आहेत.

विक्रमी प्री-बुकिंग

सॅमसंगची नवीन फोल्डेबल स्मार्टफोन सीरिज भारतात 9 जुलै 2025 रोजी लाँच झाली. सॅमसंगने गेल्या आठवड्यात गॅलेक्सी झेड फोल्ड7, गॅलेक्सी झेड फ्लिप7 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप7 एफई स्मार्टफोन सादर केले होते.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “या वर्षाच्या सुरुवातीला गॅलेक्सी एस25 सीरिजसाठी मिळालेल्या प्री-बुकिंगच्या जवळपास ही संख्या आहे.”

सॅमसंगला त्यांच्या स्मार्टफोन गॅलेक्सी एस25 साठी लाँचनंतर सुमारे तीन आठवड्यांच्या कालावधीत विक्रमी 4.3 लाख प्री-बुकिंग मिळाल्या होत्या. पहिल्या 48 तासांसाठी, एस25 आणि फोल्ड7/फ्लिप7 साठी प्री-बुकिंगची संख्या जवळपास सारखीच आहे.

किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

‘मेड-इन-इंडिया’ फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 89,000 ते 2.11 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

  • गॅलेक्सी झेड फोल्ड7 ची किंमत 1.75 लाख रुपयांपासून सुरू होऊन 2.11 लाख रुपयांपर्यंत जाते.
  • गॅलेक्सी झेड फ्लिप7 ची किंमत 1.10 लाख ते 1.22 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
  • गॅलेक्सी झेड फ्लिप7 एफई ची किंमत 89,000 रुपयांपासून सुरू होऊन 95,999 रुपयांपर्यंत आहे.

गॅलेक्सी झेड फोल्ड7 ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • डिस्प्ले: यात दोन डिस्प्ले दिले आहेत. आतील मुख्य फोल्डेबल डिस्प्ले 8 इंचांचा आहे. हा पॅनेल “डायनॅमिक एमोलेड 2एक्स” असून त्याचे रिझोल्यूशन 2184 x 1968p किंवा क्यूएक्सजीए प्लस आहे आणि कमाल रिफ्रेश दर 120 हर्ट्झ आहे. बाहेरील कव्हर डिस्प्ले 6.5 इंचांचा असून तो देखील डायनॅमिक एमोलेड 2एक्स आहे, त्याचे रिझोल्यूशन 2520 x 1080p किंवा एफएचडी प्लस आहे आणि रिफ्रेश दर 120 हर्ट्झपर्यंत आहे.
  • प्रोसेसर: फोल्ड 7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट फॉर गॅलेक्सी द्वारे चालतो.
  • मेमरी: रॅम 16 जीबी पर्यंत आणि स्टोरेज 1 टीबी पर्यंत असू शकते.
  • कॅमेरा: फोल्ड 7 मध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत. मागील बाजूस तीन (200-मेगापिक्सेल वाइड, 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 10-मेगापिक्सेल 3एक्स टेलीफोटो) आणि दोन 10-मेगापिक्सेल शूटर, एक कव्हरवर आणि दुसरा आतील फोल्डेबल डिस्प्लेवर कॅमेरा दिला आहे.
  • सॉफ्टवेअर: सॅमसंगचा वन यूआय 8 जो अँड्रॉइड 16 वर आधारित आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 4,400 एमएएच बॅटरी दिली आहे.
  • चार्जिंग: फोल्ड 7 मध्ये 25 वॅट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगची सोय आहे.
  • कनेक्टिव्हिटी: 5जी, एलटीई, वाय-फाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 ची कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.