‘भारतीय भाषा शिकण्यात अर्थ नाही’, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, नेटकरी म्हणाले…

Indian Language Debate

Indian Language Debate | सध्या महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेवरून वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे. काही राजकीय पक्षांकडून महाराष्ट्रात केवळ मराठीच बोलण्याचा आग्रह केला जात आहे. महाराष्ट्रप्रमाणेच कर्नाटक, तामिळनाडूमध्ये देखील अशाच प्रकारचा वाद पाहायला मिळत आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय भाषा शिकण्यात काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. चांगली अर्थव्यवस्था असलेल्या देशातील भाषा शिकावी, असे म्हटले आहे. ही पोस्ट व्हायरल होत असून, नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

वादाला तोंड फोडणारी पोस्ट:

‘टोका’ नावाच्या एका एक्स (ट्विटर) यूजरने केलेल्या पोस्टमध्ये असा युक्तिवाद केला होता की, मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या भाषा शिकणे अधिक महत्त्वाचे आहे. “जर मी जपानला गेलो, तर जपानी शिकेन. जर मी चीनला गेलो, तर चिनी शिकेन. जर मी बेंगळूरूला गेलो, तर इंग्लिश बोलणे पसंत करेन. जर मी चेन्नईला गेलो, तर इंग्लिश बोलणे पसंत करेन,” असे या पोस्टमध्ये म्हटले होते.

“कमकुवत अर्थव्यवस्था आणि कमी जीवनमान असलेल्या भाषा शिकण्यात काही अर्थ नाही.” असेही या युजरने म्हटले आहे. की, कंपन्यांनी या शहरांमधील त्यांच्या गुंतवणुकीला लहान-मोठ्या उद्योगांपर्यंतच मर्यादित ठेवावे, जेणेकरून स्थलांतरितांना होणारा “भाषेचा छळ” टाळता येईल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेटकऱ्यांकडून तीव्र टीका:

या पोस्टवर प्रादेशिक भाषा आणि संस्कृतींचा अनादर केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली. एका यूजरने लिहिले की, “असे अनेक लोक आहेत जे सभ्यपणे वागतात, स्थानिक भाषा शिकतात आणि त्यांचा आदर करतात. परदेशी नागरिकही हे सहज आणि अभिमानाने करतात.”

दुसऱ्याने लिहिले की “चेन्नई आणि बेंगळूरू सारख्या शहरांमध्ये बहुतेक नोकऱ्या करण्यासाठी पुरेसे स्थानिक लोक आहेत. त्यांना अनेक स्थलांतरितांची गरज नाही.”

या वादामुळे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांमधील सध्याचा तणाव पुन्हा वाढला आहे. आणखी एकाने लिहिले की, “आम्ही इंग्लिशमध्ये बोलण्यास आनंदी आहोत. आम्हाला हिंदी शिकण्याची अपेक्षा करू नका.”