Brain-Affecting Tapeworm Infections: सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुंबईतील (Mumbai Rain) डॉक्टरांनी मेंदूवर (Brain-Affecting Tapeworm Infections) परिणाम करणाऱ्या एका गंभीर संसर्गाबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. न्यूरोसिस्टिसर्कोसिस (Neurocysticercosis) नावाचा हा आजार टेपवर्म संसर्गामुळे होतो आणि मेंदूत गाठी निर्माण करतो. डॉक्टरांनी याबाबत सार्वजनिक सल्ला जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुंबईसह देशातील अन्य महानगरांमध्ये टेपवर्म संसर्गाचे प्रमाण वाढत असून पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होते.
न्यूरोसिस्टिसर्कोसिस म्हणजे काय?
हा एक परजीवीजन्य आजार असून यात टेपवर्म (एकप्रकारचे जंतू) शरीरात प्रवेशामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होतो. यामध्ये मेंदूत गाठी तयार होतात, झटके येतात आणि काही प्रकरणांमध्ये दृष्टी गमावण्याची शक्यता असते. हा संसर्ग मुख्यत्वे टेपवर्मची अंडी शरीरात गेल्याने होतो.
पावसाळ्यात संसर्गाचा धोका का वाढतो?
- मुसळधार पावसामुळे सांडपाणी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळते
- अस्वच्छतेमुळे अन्न व पाणी दूषित होते
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा अभाव
- पूराच्या पाण्यात धुतलेल्या पालेभाज्या
- पावसाळ्यात इतर संसर्गांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
लक्षणे आणि निदान
या आजाराची लक्षणे झटके येणे, डोकेदुखी, मळमळ, दृष्टी गडबड, गोंधळ उडणे अशा स्वरूपात दिसून येतात. काही वेळा स्ट्रोकसारखी लक्षणेही जाणवतात. निदानासाठी सीटी किंवा एमआरआय स्कॅनसह रक्त तपासणी केली जाते.
उपचार आणि प्रतिबंध
उपचारासाठी अलबेंडाझोल, प्राझीक्वेंटल यांसारखी औषधे वापरली जातात. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियाही करावी लागते.
संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता, सुरक्षित पाणी, पूर्ण शिजवलेले मांस आणि योग्य अन्न साखळी आवश्यक आहे.
काय करावे?
- जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात धुणे
- स्वच्छ पाणी वापरणे
- अन्न पूर्ण शिजवून खाणे
- नखे स्वच्छ ठेवणे
काय टाळावे?
- उघड्यावर शौच
- प्रक्रियाविना पाणी पिणे
- अर्धवट शिजवलेले मांस खाणे टाळावे
- झटक्यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष
मुंबईसह इतर शहरे सध्या पावसाळ्याच्या झळा सोसत आहेत, अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मेंदूला धोका पोहोचवणारा हा संसर्ग स्वच्छतेच्या साध्या सवयींमुळे टाळता येऊ शकतो.