व्हॉट्सॲपवर तुमचे चॅट्स राहणार अधिक सुरक्षित; नवे प्रायव्हसी फीचर लाँच

लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी ‘ॲडव्हान्स चॅट प्रायव्हसी’ (Advanced Chat Privacy) नावाचे एक नवीन गोपनीयता फीचर लाँच केले आहे. हे फीचर वैयक्तिक मेसेज आणि कॉल्सची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

या नवीन सुविधेमुळे प्लॅटफॉर्मच्या सध्याच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमध्ये आणखी सुधारणा झाली आहे, ज्यामुळे केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त करणाराच त्यांचे संभाषण वाचू शकतो.

हे नवीन सेटिंग वैयक्तिक चॅट आणि ग्रुप डिस्कशन दोन्हीमध्ये उपलब्ध असेल. याचा उद्देश व्हॉट्सॲपबाहेर अनधिकृतपणे माहिती शेअर करणे थांबवणे हा आहे. आता यूजर्स इतरांना चॅट एक्सपोर्ट करण्यापासून, आपोआप मीडिया त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड करण्यापासून आणि एआय फीचर्ससाठी मेसेज वापरण्यापासून ब्लॉक करू शकतात. यामुळे सहभागींना खात्री मिळते की त्यांचे संभाषण ॲपमध्येच सुरक्षित राहील.

व्हॉट्सॲपने या फीचरचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हे विशेषतः अशा ग्रुप्ससाठी उपयुक्त आहे जिथे यूजर्सची एकमेकांशी जास्त ओळख नसते, पण त्यांना आरोग्य सहाय्य गट किंवा सामुदायिक आयोजन प्रयत्नांसारख्या संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करण्याची गरज असते.

‘ॲडव्हान्स चॅट प्रायव्हसी’ फीचरचा वापर करण्यासाठी, यूजर्स चॅटच्या नावावर टॅप करून संबंधित पर्याय निवडू शकतात. हे फीचरचे बीटा व्हर्जनमध्ये आहे. हे अपडेट सध्या व्हॉट्सॲपच्या नवीनतम आवृत्ती वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी रोल आउट केले जात आहे.