१२५ तोळे सोने घालून मिरवणार्‍यामाजी नगरसेविका अपक्ष लढणार

सोलापूर – १२५ तोळे सोने घालून मिरवणार्‍या चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच उद्या मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निष्ठावंत समर्थक म्हणून श्रीदेवी फुलारे ओळखल्या जात होत्या. मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे फुलारे यांनी पक्षाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता त्या विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चर्चेला उधाण आले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.