अंतराळवीर शुभांशू शुक्ला सुखरूप परतले! भारताने इतिहास रचला! अभिमानाचा क्षण

मुंबई- भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील 18 दिवसांची यशस्वी मोहीम पूर्ण करत सुखरूपपणे पृथ्वीवर परत येत इतिहास रचला. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या मिशन कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे तीन अंतराळवीरही सुखरूप परतले.
चारही अंतराळवीरांना घेऊन येणाऱ्या ‌‘ग्रेस‌’ या ड्रॅगन यानाचे कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग झाले. ‌‘ॲक्सिओम-4‌’ या खासगी अंतराळ मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे शुभांशू शुक्ला हे पहिले भारतीय ठरले. 1984 साली राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर अंतराळात झेप घेणारे शुक्ला हे भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले असले तरी अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. शुक्ला हे पृथ्वीवर आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले होते.
या मोहिमेसाठी भारताने सुमारे 550 कोटी रुपयांचा खर्च केला, ॲक्सिओम स्पेस, नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त सहकार्यातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. 25 जून 2025 रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन 9 रॉकेटच्या माध्यमातून या मोहिमेला सुरुवात झाली होती. 28 तासांच्या प्रवासानंतर 26 जून रोजी ग्रेस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. 18 दिवसांच्या मोहिमेनंतर काल 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता ग्रेस यान आयएसएस पासून वेगळे झाले. त्यानंतर सुमारे 22.5 तासांचा परतीचा प्रवास पूर्ण करून आज 15 जुलै रोजी दुपारी 3.01 वाजता यान समुद्रात यशस्वी उतरले. 5.7 किलोमीटर उंचीवर ड्रोग पॅराशूट आणि 2 किलोमीटर उंचीवर मुख्य पॅराशूट व्यवस्थित उघडल्यामुळे लँडिंग अधिक सुरक्षित झाले. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी 310 हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा घातली आणि 1.3 कोटी किलोमीटरपेक्षा अधिकचा अंतराळ प्रवास केला. त्यांनी 300 हून अधिक सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवले. 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोगांत भाग घेतला. त्यात भारताचे सात महत्त्वाचे प्रयोगही होते. शून्य गुरुत्वाकर्षणात मेथी व मूग बियांच्या उगवण्याचा प्रयोग विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्ला यांच्या पुनरागमनानंतर त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. गुरुत्वाकर्षणाशी शरीर जुळवून घेण्यासाठी त्यांना 7 ते 10 दिवस रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत ठेवले जाईल. त्यानंतर शुक्ला यांचे भारतात आगमन होण्याची शक्यता आहे.
ॲक्सिओम-4 मिशन हे भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठी तसेच स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या मोहिमेमुळे भारताने मानवी अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. चार दशकांनंतर भारतीय अंतराळवीरांनी आयएसएसवर काम केल्याने ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. 1984 नंतरच्या 41 वर्षांत भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ही सर्वात मोठी झेप मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इतिहास घडवणाऱ्या अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे मी संपूर्ण देशासोबत स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी समर्पण, धैर्य आणि पुढाकाराने देशातील अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. भारताच्या मानव अंतराळ मोहिमेसाठी व गगनयानच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
शुभांशूचे आई – वडील म्हणाले की, आमचा देवावर विश्वास आहे. आमच्या मुलाचे सुरक्षित परतणे ही आमच्यासाठी जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.
सुनिता विल्यम्स नंतर शुभांशू
भारतीय वंशाची सुनिता विल्यम्स ही अंतराळवीर 5 जून 2024 रोजी सहअंतराळवीर बूच विल्मोर यांच्यासह अंतराळ स्थानकाकडे रवाना झाली होती. ती आठ दिवसांनी परतणार होती. मात्र तिचे परतीचे यान खराब झाले. त्यामुळे ती तिथे अडकली. अखेर नासाने एलन मस्कच्या स्पेसएक्सची मदत घेतली आणि त्यांच्या ड्रॅगन कॅप्सुलमधून 286 दिवसांनी 18 मार्च 2025 या दिवशी सुखरुप पृथ्वीवर परतली.