Home / महाराष्ट्र / आजचा भारत-पाकिस्तान सामना पाहू नका! पाहणारे देशद्रोही! उद्धव ठाकरे संतापले

आजचा भारत-पाकिस्तान सामना पाहू नका! पाहणारे देशद्रोही! उद्धव ठाकरे संतापले

मुंबई- संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी (Abu Dhabi) येथे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत (India) आणि पाकिस्तान(...

By: E-Paper Navakal
Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray


मुंबई- संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी (Abu Dhabi) येथे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत (India) आणि पाकिस्तान( Pakistan) यांच्यात साखळी फेरीतील सामना होणार आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानविरुद्धचा हा सामना भारताने खेळू नये, अशी मागणी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने (उबाठा) केली आहे. यासाठी उद्या उबाठा राज्यव्यापी आंदोलन करत ‌‘हर घर से सिंदूर‌’ ही मोहीम राबवणार आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पंतप्रधान मोदींकडून देशभक्तीचा व्यापार सुरू असल्याची टीका करत उद्याच्या मॅचवर बहिष्कार टाका. टीव्हीवरही मॅच बघू नका, असे आवाहन केले. हा सामना पाहणारे देशद्रोही आहेत, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आज मी उद्विग्न आणि विषण्ण मनाने तुमच्याशी बोलत आहे. उद्या अबुधाबीमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आहे. अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त सुकलेले नाही. त्यांच्या जखमा भरलेल्या नाहीत. त्या घटनेनंतर भारतीयांना वाटले होते की, आता पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे करून टाकावेत. त्या दृष्टीने एक हल्ला आणि युद्धही करण्यात आले. त्याला ऑपरेशन ‌‘सिंदूर‌’ असे नाव देण्यात आले. नंतर आपल्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, हे ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. एकूणच जे काही वातावरण होते, ते आपल्यासाठी अनुकूल नव्हते. ठरावीक दिवसांनी किंवा वर्षांनी पाकिस्तान आपल्यावर अतिरेकी हल्ला करतो, तेव्हा आपण सर्वजण जागे होतो आणि सरकारही चवताळून उठते.
ते पुढे म्हणाले की, भालाफेकीत भारताचा गौरव करणाऱ्या नीरज चोप्राने एका पाकिस्तानी प्रशिक्षकाला भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. तो प्रशिक्षक आला नाही, तरीही अंधभक्तांनी नीरजवर देशद्रोही असल्याची टीका केली होती. त्यावेळी त्याच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही करवत नाही. नीरज चोप्रा आणि लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपाच्या अंधभक्तांचे काय करणार? ज्या पाकिस्तानविरुद्ध आपण युद्ध पुकारले होते, त्याच पाकिस्तानसोबत आता क्रिकेट खेळले जाणार आहे. आज असे अचानक काय बदलले? ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींनी जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवून भारताची लढाई ही पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध आहे, असा संदेश दिला होता. मग आता नेमके काय झाले? ही देशभक्तीची थट्टा आहे, देशभक्तीचा व्यापार आहे. व्यापारापुढे देशाची किंमतच राहिलेली नाही. त्यामुळे राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी आता पाकिस्तानसोबतचे युद्ध थांबवल्याची घोषणा करावी. अखेरीस पाकिस्तानच्या बाबतीतील आपली खरी भूमिका काय आहे, हे देशासमोर स्पष्ट करावे. एखाद्या खेळावर बहिष्कार टाकल्यामुळे कोणतेही जागतिक संकट निर्माण होत नाही.
या मुद्यावरून भाजपावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची भाजपाची औकात नाही. भाजपाने औकातीत राहावे. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. कारण बाळासाहेब कधीच जावेद मियांदादच्या घरी गेले नाहीत, जसे मोदीजी नवाझ शरीफच्या घरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि केक खायला गेले होते. आज जर सरदार वल्लभभाई
पटेल पंतप्रधान झाले असते, तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नही उद्भवला नसता. मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, उद्या जय शहासोबत, तुमच्यासोबत बसलेले सर्व आंडू-पांडू लोक जर सामना पाहायला गेले, तर तुम्ही त्यांना नीरज चोप्रासारखे देशद्रोही ठरवणार का? सामना पाहण्यासाठी जाणारे प्रेक्षक देशद्रोही ठरणार का? टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्यांनाही देशद्रोही म्हणणार का? मी देशवासीयांना शिवसेनेच्या वतीने आवाहन करतो की, उद्याच्या मॅचवर बहिष्कार टाका. कोणीही टीव्हीवर मॅच बघू नका. हे देशवासीयांनी ठरवायचे आहे. पण भाजपावाले पैसे देऊनही मॅचसाठी लोकांना पाठवतील.
उबाठाच्या ‌‘हर घर से सिंदूर‌’ मोहिमेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर निषेध व्यक्त केला जाईल. ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपाकडून ‌‘हर घर सिंदूर‌’ मोहीम राबवली जाणार होती, पण ती पूर्णपणे फसली. आता या मोहिमेचा निषेध म्हणून मोदींना हर घर से सिंदूर पाठवला जाईल. यासाठी उद्या सकाळी शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राज्यभरातील प्रमुख शहरांतील चौकात जमतील. त्या सिंदूरच्या पुड्या एका मोठ्या डब्यात जमा करतील. त्यानंतर हे डबे पोस्टाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील.
उबाठाच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे खासदार आणि माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आशियाई किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेद्वारे बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात, तेव्हा एक देश म्हणून त्यात सहभागी होणे आवश्यक आणि अनिवार्य असते. ते सहभागी झाले नाहीत, तर ते स्पर्धेतून बाहेर जातील. त्यांना सामना सोडावा लागेल आणि दुसऱ्या टीमला गुण मिळतील. भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय स्पर्धा खेळत नाही. पाकिस्तान भारतावरचे दहशतवादी हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय स्पर्धा खेळणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या