मुंबई- विधान भवनात सत्ताधारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत काल झालेल्या हाणामारीचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उमटले. या घटनेचा अहवाल आल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात या प्रकरणी कारवाईची घोषणा केली. मारहाण प्रकरणातील दोन्ही कार्यकर्त्यांविरोधात विशेषाधिकार भंग अवमानाच्या कारवाईसाठी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे पाठवलेे. या दोघांसह त्यांच्यासोबतच्या सहा जणांवर फौजदारी कारवाईचेही सूतोवाच केले. याशिवाय विधान भवनात येणाऱ्या अभ्यागतांची जबाबदारी आमदारांची असल्यामुळे पडळकर व आव्हाड यांनी सभागृहात खेद व्यक्त करावा, असेही नार्वेकरांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील आमदार केवळ दिलीगिरीवर सुटले, तर त्यांच्यासाठी झुंजणारे कार्यकर्ते फौजदारी कारवाईत अडकले, अशी चर्चा होत आहे.
राहुल नार्वेकरांच्या आदेशांनंतर आधी गोपीचंद पडळकर यांनी दिलीगिरी व्यक्त केली. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे काही घडले ते वाईट आणि चुकीचे होते. माझा या प्रकरणाशी संबंध नाही असे म्हणत आपल्याला व्हॉट्सॲपवर शिवीगाळ करत धमकावल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्याचा एकमेकांशी संबंध नाही. राजकारणापलीकडे जाणार आहात की नाही, असा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवल्यावर आव्हाड यांनीही खेद व्यक्त केला.
गेल्या दहा दिवसांपासून पडळकर आणि आव्हाड यांच्यात शरद पवारांवरील टीकेमुळे वाद सुरू झाला. पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे. हे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाते अशी टीका नाव न घेता पवार कुटुंबीयांवर केली होती. त्यानंतर विधिमंडळ परिसरात आव्हाड यांनी पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोर असे म्हणत डिवचले होते. बुधवारी आव्हाड आणि पडळकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. जितेंद्र आव्हाड विधिमंडळ प्रवेशद्वाराजवळून पायी जात असताना आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी थेट त्यांच्या जवळ आली. यावेळी पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जोरात पायाला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी मी एकटाच आहे, कधी ही ये. तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही अशी भाषा पडळकर यांनी वापरली. तर मी आयुष्यभर मुंबईत राहिलो आहे धमक्या देऊ नका असा इशारा आव्हाड यांनी दिला. तर दुसऱ्या दिवशी पडळकर समर्थकाने मोबाईलवर शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर काल ही मारहाणीची घटना घडली.
याबाबत विधानसभेत राहुल नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना मावस भाऊ सर्जेराव टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे अनधिकृतपणे सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह आहे. विधान भवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात कार्यकर्त्यांना आत आणायची गरज नव्हती. आले तर त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते. जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यांगतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी. त्याचबरोबर सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही, अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो.
विधानसभा अध्यक्षांनी पडळकर आणि आव्हाड यांना हाणामारीच्या घटनेबद्दल खेद व्यक्त करायला सांगितल्यावर पडळकर यांनी दोन वाक्यात दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आव्हाडांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले नव्हते. मी सभागृहात येताना मी रोज एकटा येतो. माझ्यासोबत मी कधीही कोणाला आणत नाही. मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही किंवा कोणाला पास देत नाही. काल ही घटना घडली तेव्हा मी मरीन लाईन्सला होतो. या घटनेशी माझा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कोणाला चिथावणी दिली किंवा खुणावले नाही. मलाच व्हॉट्सॲपवर धमक्या येत आहेत.
यावेळी आव्हाड यांना मध्येच अडवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मनाई नाही. पण अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही? कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथल्या बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत, त्या एकट्या पडळकर किंवा त्यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोलले जाते आहे. हे सगळे आमदार माजले आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही. विषय राजकीय करायचा असेल, तर ते योग्य होणार नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष आव्हाडांना म्हणाले की, चौकशी केल्यानंतरच मी या प्रकरणाची माहिती दिली आहे. आपण आता जी माहिती दिली आहे, त्याबाबत चौकशी करून पुढील निर्णय घेईन.
काल संध्याकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ ही हाणामारी घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबले होते. त्याच दरम्यान त्यांचे हाणामारीत सहभागी असलेले समर्थक नितीन देशमुख यांना पोलीस विधान भवनाच्या मागच्या प्रवेशद्वाराने घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवली. आव्हाड थेट गाडीच्या खाली घुसले होते. पोलिसांना त्यांना फरफटत बाहेर काढावे लागले. त्यामुळे काल मध्यरात्री विधिमंडळ परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पाठराखण केली जात असून, वडापाव आणि तंबाखू मळून पोलीस त्यांना देत आहेत, असा आरोप आव्हाड यांनी केला.
यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. पण पोलिसांनी त्यांनाच ताब्यात घेतले. या प्रकरणी मी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केले. आरोपीला मोकाट सोडून पीडिताला अटक करणे हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे. आम्ही सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू.
हाणामारीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. हे सार्वभौम सभागृह आहे. याचे पावित्र्य सगळ्यांनी राखले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आणि अध्यक्ष महोदयांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई व्हावी अशी सगळ्यांची भावना आहे. तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, हे सगळे प्रकरण हक्कभंग समिती समोर गेले पाहिजे. पुन्हा एकदा नियमावली बनवली पाहिजे. जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभे राहिले ते वाखाणण्याजोगे आहे.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही सत्तेची मस्ती आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, पडळकरांनी इशारा करून नितीन देशमुखांना मारण्यास सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्यावरदेखील हल्ला करायचा होता म्हणून गुंड विधान भवनाच्या आवारात आणले होते. हे राज्य कायद्याचे राज्य राहिले नाही. सरकारच्या मर्जीनुसार चालणारे राज्य झाले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करू त्याला संपवून टाकू ही सत्तेची मस्ती आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर विधान भवनाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकाराला मारहाण केली, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला. नितेश राणे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड विधान भवनात उभे होते. तिथे अंबादास दानवे आले. त्यामुळे पत्रकारही तिथे आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडिओ पत्रकार शूट करत होते, तेव्हा आव्हाड यांनी रागातच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला केला. विधान भवनसारख्या पवित्र स्थळी त्यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. त्याला वार्तांकन करण्यापासून रोखले. हा केवळ पत्रकारिता नाही, तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे.
विधिमंडळातही आता नीतीमूल्य समिती
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधिमंडळासाठी आज नीतीमूल्य समितीची घोषणा केली. ते म्हणाले की, आमदारांचे वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे. अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या धर्तीवर विधिमंडळातही नितीमूल्य समिती गठीत केली जाईल. याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल. लोकसभेत या समितीने खासदारांचे निलंबनच नव्हे तर सदस्यत्वदेखील रद्द केले आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी या समितीला गांभीर्याने घ्यावे. अधिवेशनाच्या काळात यापुढे फक्त शासकीय अधिकारी, आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अनेकदा मंत्री विधिमंडळात बैठक घेतात. पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घ्याव्यात. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली, तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाईल.