मुंबई- शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याबाबतचे दोन्ही अध्यादेश सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकत्र विजयी मेळावा होणार आहे. हा मेळावा शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार अशी चर्चा होती. परंतु आता तो शिवतीर्थाऐवजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आज दिली.
ते म्हणाले की, माझी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे या दोघांशी चर्चा झाली आहे. हे दोन्ही बंधू 5 जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. आम्ही आधी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र हे सरकार आम्हाला शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देईल असे वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी वरळी डोमचा पर्याय सुचवला. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली आहे. महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ अजून जिवंत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगतो की, टायगर अभी जिंदा है. 5 तारखेला होणाऱ्या मराठी विजय दिवसाला आम्ही त्यांनाही बोलावणार आहोत. त्यांनी बघावे की मराठी एकजुटीने कसा विजय मिळवला. या लढ्यात जे सहभागी झाले होते त्या राष्ट्रवादी, काँग्रेस, डावे पक्ष या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू. कारण महाराष्ट्राची एकजूट असे आपण म्हणतो तेव्हा ती राजकीय पक्षाच्या पलीकडे असते. जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उभा राहिला, हेच आम्हाला मोदी आणि शहा यांना दाखवून द्यायचे आहे. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे असतील, आम्हाला संघर्ष करायला आवडते. देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही. जीआरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका.
संजय राऊत यांनी या विजयी मेळाव्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना एक्स पोस्ट टॅग करत दिले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड… यावे जागराला यावे असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्र
ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार तयारी केली जात आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत मराठी जनतेला एकत्र आवाहन केले आहे.
आवाज मराठीचा! अशा घोषवाक्याने सुरू होणाऱ्या या पत्रकात म्हटले आहे की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का? हो, नमवले आणि कोणी नमवले तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवले. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या. आम्ही वाट पाहत आहोत. पत्रकाच्या शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी दोघांची नावे आहेत.
