मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून कबुतरखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला जैन समाजाने विरोध केला आहे. आज या विरोधातून मुंबई महापालिकेने बंद केलेल्या दादर परिसरातील कबुतरखान्याबाबत जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी कबुतरखान्याला लावलेली ताडपत्री फाडली. कबुतरांना दाणे टाकले. पोलिसांशी झटापट केली. विशेष म्हणजे, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यावर कारवाई न करण्याचे निर्देश देऊनही जैन समाजाने हे आंदोलन करून पोलीस यंत्रणा आणि या परिसरातील रहिवासी यांना विनाकारण वेठीस धरले.
कबुतरखान्यावरील कारवाईच्या बाबतीत आज जैन समाजाच्या वतीने दादरच्या जैन मंदिरात सर्वधर्मीय सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्याबाबत निर्देश दिल्यानंतर ही सभा रद्द करण्यात आली. परंतु सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक जैन समाजाचा मोठा समूह कबुतरखान्याकडे पोहोचला. त्यांनी आक्रमक होत पालिकेने कबुतरखान्यावर टाकलेले प्लास्टिकचे आच्छादन फाडायला सुरुवात केली. महिला आंदोलकांनी हे आच्छादन हटवून तेथे ठिय्याच मांडला. आंदोलकांनी सोबत आणलेले दाणे कबुतरांना टाकत पालिका कारवाईचा विरोध केला. यावेळी जैन बांधव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. जैन आंदोलकांनी कबुतरखाना परिसरात जियो और जिने दो, अशी घोषणाबाजीही केली. हे आंदोलन तासभर सुरू होते. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे आस्था व लोकभावना आहे. तर दुसरीकडे लोकांचे आरोग्य आहे. या दोघांची सांगड घालावी लागेल. कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, असा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्हाला सुचलेले काही मार्ग आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत.
मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत कबुतरखान्यावरील आच्छादन काढता येणार नाही. न्यायालयापुढील सुनावणीसाठी काही निरीक्षणे नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत पालिकेला सध्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आंदोलनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की,आज कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे होते. कायदा हातात न घेता मुंबईकरांनी शांतता राखावी. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासंदर्भात जैन समाजाच्या ट्रस्ट प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या आंदोलनात बाहेरचे लोक आले होते. आमचा आंदोलनाशी संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल ट्रस्टने समाधान व्यक्त केले होते. त्यांनी आपली बैठक पुढे ढकलली होती.
मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, शांतप्रिय जैन समाज जर आक्रमक झाला आहे. त्यामागे राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे. कबुतरखाना विषयावर ते आक्रमक होत असतील तर माधुरी हत्तीणीला आणण्यासाठी आम्हीही हिंसक आंदोलन करायचे का? कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो, असे अनेक डॉक्टर सांगतात. त्यामुळे लोकवस्तीपासून दूर अंतरावर कबुतरखाना सुरू करावा आणि धर्म निभावावा. माधुरी हत्तीण किंवा कबुतरखाना दोन्ही विषय न्यायप्रविष्ट आहेत. या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाने भूमिका मांडावी.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य जनतेच्या भावना लक्षात घ्याव्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई परिसरात अनेक वर्षांपासून अनेक कबुतरखाने आहेत. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार उद्भवतात असे काहींचे म्हणणे आहे. अखेरीस न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. पण जनतेच्या मनात काय आहे हेही महत्त्वाचे आहे. ही राजकारणाची बाब नसून माणुसकीच्या नात्याने विचार केला पाहिजे. पक्षी-प्राण्यांवर प्रेम दाखवणे, ही आपली परंपरा आहे.
