मुंबई- अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभर गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच काही दुर्घटनांमुळे या उत्साहाला दुःखाची किनार आली. मुंबई, अमरावती, चाकण, चंद्रपूर, नांदेड, जळगाव, नाशिक,अकोला, भाईंदर, विरार येथे घडलेल्या दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू झाला. यातील काहींचा बुडून, तर काहींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. काही अपघातात दगावले आहेत. अनेक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर विसर्जन मिरवणूक निघण्यापूर्वी भीषण अपघात झाला. भरधाव वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. आज पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलांच्या अंगावरून आपले वाहन नेले. या भीषण अपघातात दोन्ही चिमुकली मुले चिरडली गेली. त्यात 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिचा 11 वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला. या अपघातातील मृत बालिकेचे नाव चंद्रा वजणदार (2) असे आहे. तर तिच्या गंभीर जखमी झालेल्या भावाचे नाव शैलू वजणदार (11) असे आहे. त्याला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत आहेत. ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. मुंबईतील साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्चदाबाच्या तारेचा धक्का लागून बिनू शिवकुमार (36) हा तरुण दगावला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. श्री गजानन मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. खासगी कंपनीच्या 11 हजार व्होल्टेजचा वीजप्रवाह वाहून नेणाऱ्या तारेचा गणपतीच्या ट्रॉलीला स्पर्श झाला. त्यामुळे पाच जणांना शॉक लागला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, शिवकुमार याचा मृत्यू झाला, तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कनोजिया (14) हे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईजवळील भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून मंडळाच्या कार्यकर्ता मृत्युमुखी पडला. प्रतिक शहा (34) असे त्याचे नाव होते. त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा कार्यकर्ता वेळेवर मदत मिळाल्याने वाचला. मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, मंडळाने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला होता. मंडळाने रस्त्यांवर व झाडांवर विद्युत रोषणाई केली होती. यासाठी विजेच्या तारा झाडांच्या फांद्यांवर बांधून तोरणमाळा टाकण्यात आल्या होत्या. काल रात्री साडेसात वाजताच्या सुमारास विसर्जन मिरवणूक निघाली असता प्रतिक शहाचा हात झाडावर टांगलेल्या विजेच्या तारेला लागला. त्यानंतर विजेचा धक्का बसून तो तिथेच चिकटला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कार्यकर्ता पुढे आला असता त्यालाही शॉक लागला. मात्र प्रसंगावधान राखून उपस्थितांनी बांबूच्या मदतीने त्याला बाजूला केले. मात्र, प्रतिक शहाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विरारमधील तीन भाविक नशीबवान ठरले. मारंबळपाडा जेट्टीवर एकाच कुटुंबातील हे सदस्य आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरले होते. त्यात एका महिलेचाही समावेश होता. विसर्जन करण्यासाठी ते खोल पाण्यात गेले. मात्र समुद्राची खोली आणि पाण्याचा वेग याचा अंदाज न आल्याने तिघेही वाहून जाऊ लागले. याची माहिती मिळताच सुवर्णदुर्ग रो-रो सेवेचे कर्मचारी फेरीबोट घेऊन तत्काळ तिथे पोहोचले. स्थानिक मच्छिमारांनीही आपल्या बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर मच्छीमारांच्या छोट्या बोटीने त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
गणेश विसर्जनावेळी अमरावती जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे करण चव्हाण (22) हा तरुण विसर्जनासाठी नदीकाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. मेळघाटातील धूळघाट रोडवरील गडगा येथे अनिल माकोडे या तरुणाचा नदीपात्रात पडून मृत्यू झाला, तर दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात विसर्जनासाठी गेलेल्या मुक्ता श्रीनाथ (32) या तरुणीचाही पाण्यात पडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजण बुडाले. त्यातील दोघांचा मृतदेह सापडला. तर दोघांचा शोध सुरू आहे. वाकी बुद्रुक येथील भामा नदीत विसर्जनासाठी गेलेले अभिषेक संजय भाकरे (21) आणि आनंद जयस्वाल (28) हे दोघे पाण्यात बुडाले. त्यापैकी आनंद जयस्वाल याचा मृतदेह मिळाला असून अभिषेक भाकरे याचा शोध पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन दल घेत आहे. शेलपिंपळगाव येथे भामा नदीतच रवींद्र वासुदेव चौधरी (45) हे वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर बिरदवडी येथे विसर्जन करताना तोल गेल्याने संदेश पोपट निकम (35) हे विहिरीत पडले. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर शहराजवळच्या इराई नदीवर दीक्षांत मोडक (18) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना भटाडी पुलाजवळ घडली. तो गणपती विसर्जनासाठी गेला असताना अचानक पाण्यात पडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. नांदेड जिल्ह्यातील गाडेगाव परिसरात आसना नदीत विसर्जनावेळी पाय घसरल्याने तीन तरुण पाण्यात पडले. यापैकी शैलेश इरबाजी उबाळे याला घाटावर उपस्थितांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, बालाजी कैलास उबाळे (18) आणि योगेश गोविंद उबाळे (17) हे दोघे नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. या दोघांचा शोध एसडीआरएफ पथक आणि ग्रामीण पोलीस घेत आहेत. जळगावातील निमखेडी शिवारात घरगुती गणपती विसर्जनावेळी 25 वर्षीय गणेश गंगाधर कोळी हा तरुण आई-वडिलांच्या डोळ्यादेखत गिरणा नदीपात्रात वाहून गेला. निमखेडी शिवारातील नवीन बायपासलगत ही घटना घडली. ममुराबाद येथील कोळी कुटुंब घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गिरणा नदीपात्रावर गेले होते. यावेळी गणेश कोळी मूर्ती घेऊन नदीत उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात वाहून गेला.
अकोल्यात गणेश विसर्जन पार पाडून परतणाऱ्या भाविकांवर मृत्यूने घाला घातला. पातूर-अकोला रोडवर कापशी तलावाजवळ दुचाकी आणि चारचाकी यांची जोरदार धडक होऊन चरण अंधारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल खोंड, विनोद डांगे आणि विक्की माळी हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
