Chief Minister Fellowship 2025-26 | महाराष्ट्र सरकारने युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम (Chief Minister Fellowship) 2025-26 साठी पुन्हा कार्यान्वित होणार आहे. यंदा या कार्यक्रमात एकूण 60 तरुण व्यावसायिकांना निवडून, त्यांना वर्षभर शासकीय यंत्रणांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात झाली होती. हा त्यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. मात्र 2019 नंतर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर आणि त्यानंतर आलेल्या (Covid-19) महामारीमुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 2023-24 मध्ये हा उपक्रम पुन्हा सुरू झाला. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो फार काळ सुरू राहू शकला नाही.
आता हा उपक्रम नव्याने पुन्हा सुरू होत असून, 21 ते 26 वयोगटातील तरुणांना या कार्यक्रमासाठी अर्ज करता येणार आहे. एकूण 210 उमेदवारांची प्राथमिक निवड ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणीद्वारे केली जाणार असून, त्यानंतर निबंध आणि अंतिम मुलाखत मुंबईत घेतली जाणार आहे. यामध्ये कमीतकमी 1/3 महिला उमेदवारांचा समावेश अनिवार्य राहणार आहे. पात्र उमेदवारांना दरमहा रुपये 61,500 (रुपये 56,100 मानधन + रुपये 5,400 प्रवास भत्ता) मानधन दिले जाईल.
या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 1 वर्षाचा कार्यानुभव असणे गरजेचे आहे. तसेच अर्जासाठी रुपये 500 शुल्क असून, ऑनलाइन अर्जासोबत आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षा व निबंध लेखनानंतर, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना (Mumbai) येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
निवड झालेल्या 60 फेलोंना राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये विभागून नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात 2 ते 3 फेलो असतील. हे फेलो संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (Zilla Parishad) यांच्या अधीन काम करतील. त्यांची नियुक्ती 12 महिन्यांसाठी असेल आणि त्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. या कालावधीनंतर फेलोशिप आपोआप संपुष्टात येईल.
महत्वाचं म्हणजे, यापूर्वी या फेलोशिपमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार नाही, आणि त्याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे.
अधिकृत माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.