Home / महाराष्ट्र / फडणवीसांना ‌‘वर्षा‌’वर धुतले असते! आता हयगय नको! जरांगे यांचा इशारा

फडणवीसांना ‌‘वर्षा‌’वर धुतले असते! आता हयगय नको! जरांगे यांचा इशारा

Fadnavis would have been washed away on 'Varsha'! Jarange's warning

छत्रपती संभाजीनगर- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करून जीआर काढल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Monaj Jarange) यांनी आपले मुंबईतील आंदोलन मागे घेतले. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज त्यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, सातारा गॅझेटबाबत सरकारने हयगय करू नये. याबाबत थोड्या दिवसांत तोडगा निघाला नाही तर सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही. पण आम्हाला राजकारण नको. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra  Fadnavis) घेरायचे असते तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन धुतले असते.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मी मराठ्यांचा मुलगा आहे बाकी राजकीय पक्षांना मी मोजत नाही. मी शब्द दिला होता मुंबईत जाणार. मुंबईत तर गेलो आणि जीआर घेऊन आलो. मराठ्यांना ओबीसीत मीच घालणार आहे. मी कुणाचे ऐकून काम करत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा कोणाचे ऐकून करायचे असते, तर आरक्षण नको म्हणालो असतो. पण मी मराठ्यांचा नोकर आहे. मला राजकारण नको. फक्त मराठा आरक्षण हवे आहे, हे मी गेल्या दोन वर्षांत सिद्ध केले आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याची कोणाची टाप नाही.
ओबीसी समाजासाठी सरकारने उपसमिती नेमली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ओबीसींसाठी उपसमिती गठीत केली, तशाच समित्या दलित, मुस्लीम, शेतकरी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठी कराव्यात. कारण ओबीसींची उपसमिती मायक्रो ओबीसीसाठी काही कामी येणार नाही. गरिबांचे खरे कल्याण झाले पाहिजे. गोरगरीब ओबीसींचे काम होणार असेल, तरी ही चांगली गोष्ट आहे. त्यावर आमची काही हरकत नाही. माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या केल्या, टोळ्या माझ्या अंगावर पाठवल्या, जीआरबाबत कितीही अफवा पसरवल्या, तरी मी माझ्या गरिबाला आरक्षण देतो आहे, हे मराठ्यांना पटलेले आहे. त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय, मी आणि माझा समाज मागे हटणार नाही. त्यामुळे कितीही काही झाले, तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही. माझा विषय आरक्षण आहे. त्यासाठी मी तुटून पडलेलो आहे. कुणी कितीही आमच्या संभ्रम निर्माण केला, तरी माझा समाज कुणावर विश्वास ठेवत नाही. मीपण कुणावर विश्वास ठेवत नाही. जे आता बोंबलत आहेत, जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, हे आधी कुठे झोपले होते? बैठकीला बोलावल्यावर हे लोक येत नाहीत. मग कुरापती करतात. जे लोक बोंबलत आहेत, त्यांना बोंबलू द्या, पण मी मराठवाड्यातील सगळा मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात हे मराठ्यांना दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे त्यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले की, भुजबळ म्हणजे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचा अस्तित्व संपवणारा माणूस आहे. त्यामुळे बावनकुळे त्यांना चांगले वाटले असतील. ओबीसी उपसमितीचा अध्यक्ष कुणालाही केले, तरी मला काय करायचे आहे? तो माझा विषय नाही.
आज शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेत जीआरमुळे मराठा समाजाला दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले. भुमरे म्हणाले की, मी नेहमी जरांगे यांची भेट घेत असतो. सरकारने काढलेला जीआर मराठा समाजासाठी फायदेशीर ठरेल. जरांगे यांनी तो वाचलाही आहे. उबाठा खासदार संजय राऊत सकाळी उठून काहीही बोलतात. त्यांना केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच दिसतात. त्यांना दुसरे काही दिसतच नाही.