भावाच्या युतीबाबत मौनच! राज ठाकरे मुंबईला परतले

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. त्यांनी नाशिकच्या इगतपुरीच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी शिबीर आयोजित केले होते. साधारण 120 नेते शिबिराला उपस्थित होते. आज या शिबिराचा दुसरा दिवस होता. पण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शिबीर अर्धवट सोडून राज ठाकरे आजच मुंबईला रवाना झाले. याआधीही राज ठाकरे नाशिक दौरा अर्धवट सोडून परत आले होते. आता ते 20 जुलैनंतर पुन्हा नाशिक दौरा करणार आहेत. शिबिराचे संध्याकाळचे सत्र बाळा नांदगावकर यांनी घेतले. या शिबिरात दोघा भावांच्या युतीबाबत चर्चा झाली की नाही याबाबत पूर्ण गुप्तता पाळल्याने या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या शिबिरात सकाळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आज त्यांनी पुन्हा मनसे-उबाठा युतीबाबत भाष्य करू नका, अशा सूचना पदाधिकारी, प्रवक्ते आणि नेत्यांना केल्या आहेत. प्रवक्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोणत्या विषयावर बोलले पाहिजे आणि कोणता विषय मांडला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीत राज ठाकरेंनी सूचना केल्या की, मतदार यादीवर बारीक काम करा. युतीबाबत योग्य वेळी मीच निर्णय घेईन. तुम्ही त्यावर कोणतेही मत मांडू नका. मी माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेईन. शिबिराच्या पहिल्या दिवशी अनौपचारिक गप्पात राज ठाकरे म्हणाले होते की, याचा निर्णय पालिका निवडणूक जाहीर झाल्यावर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेऊ. या वक्तव्यानंतर शिबिरात या विषयावर मौन पाळल्याने युतीबद्दल शंका निर्माण
झाली आहे.