मंत्री शिरसाटांच्या मुलावर छळाचा गंभीर आरोप! पोलीस शांत राहिले! काही तासांत पीडितेचीही माघार

छत्रपती संभाजीनगर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी सुनांचा छळ केल्याचे धक्कादायक पुरावे उघड होत असताना आता शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने बलात्कार, बळजबरीचे लग्न आणि मानसिक-शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शाहूनगर पोलीस ठाण्यात आणि महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. पण मंत्री संजय शिरसाट यांच्या दबावामुळे हे प्रकरण पोलिसांनी दाबले. पोलीस तर शांत राहिलेच, पण महिला आयोगही गप्प राहिला, त्यातच आपण दुसरे लग्न केल्याचा फोटो शिरसाट यांच्या मुलाने पीडितेला पाठवला. शेवटी या महिलेने वकील करून सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस पाठवली आणि हे प्रकरण आज तिच्या वकिलाने जनतेसमोर आणले. मात्र त्यानंतर काही तासांत पीडित महिलेने घुमजाव करीत शिरसाट कुटुंबावर केलेले सर्व आरोप तर मागे घेतलेच, पण मुलाचे व्हायरल झालेले फोटो प्रसिद्ध केले तर कारवाई करीन असेही बजावले.
पीडित महिलेने नोटीसमध्ये म्हटले होते की, सिद्धांत शिरसाट याच्याशी 2018 मध्ये समाजमाध्यमांवर ओळख झाली. काही काळाने मैत्रीचे संबंध अधिक घट्ट झाले. सिद्धांत चेंबूर परिसरातील एका फ्लॅटवर मला घेऊन जात असे. कालांतराने शारीरिक संबंध झाले. त्यामुळे गर्भधारणाही झाली होती. पण त्याने गर्भपात करण्यास सांगितले. सिद्धांतने माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करीन असा दबाव टाकला. त्याने स्वतःच्या हातावर व शरीरावर ब्लेडने जखमा करून घेतल्या. स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून आत्महत्येची धमकी देणारे फोटो मला फेसबूक व व्हॉट्सॲपवर पाठवले. सततच्या लग्नाच्या दबावाने आणि भावनिक संवादामुळे चेंबूर सिंधी कॅम्प येथील फ्लॅटवर 14 जानेवारी 2024 मध्ये आम्ही बौद्ध पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वागणुकीत बदल झाला. त्याने मला छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्या घरी घेऊन जाण्यास नकार दिला. नंतर त्याचे आधीचे विवाहसंबंध व इतर महिलांशी असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्याने पुन्हा धमक्या द्यायला सुरुवात केली. जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन, तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीन. माझे वडील मंत्री आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत अशी धमकी दिली. याबाबत 20 डिसेंबर 2024 मध्ये शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. महिलेने नोटिशीत म्हटले आहे की मला पुढील सात दिवसांत नांदायला नेले नाही तर मी तीन गुन्हे दाखल करणार आहे. त्याचबरोबर पोटगीसाठी अर्ज करणार आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षासाठी नवी अडचण निर्माण झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. संजय शिरसाट यावर इतकेच म्हणाले की, सिद्धांतचे हे वैयक्तिक प्रकरण आहे. याबाबत माहिती घेऊन बोलेन.
महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सिद्धांत शिरसाट यांनी सतत लग्न करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे महिलेने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला. त्याच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी लग्न केले. महिलेच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचे बौद्ध पद्धतीने लग्न झाले. त्याने स्वतःच्या नावाने महिलेला सिम कार्ड घेऊन दिले. त्या सिम कार्ड मधील संवाद, फोटो व कॉल रेकॉर्ड हे महिलेकडे आहेत. सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबण्यात आले. लग्न झाल्यावर तो तिला घरी नेईन. चेंबूरमधून बाहेर पडायचे नाही असे तो धमकी देत होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याचे सांगितले तेव्हा महिलेने न्याय मागायचे ठरवले. तिने 50 लाख रुपये हुंड्यापोटी न दिल्यामुळे तिचा छळ करण्यात आला. सात दिवसांच्या आत सिद्धांतने तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे. तिला न्याय द्यावा अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
यावर महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विरोधी पक्षनेते उबाठाचे अंबादास दानवे म्हणाले की, एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने याबाबत तक्रार केली असेल तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा दाखल करून न घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करावी. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले. ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता सगळे लोक गप्प का आहेत? यावर राज्याचा महिला आयोग का गप्प आहे? आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आमची हात जोडून विनंती आहे की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या. मात्र काही तासांनंतर सदर महिलेने नोटीस मागे घेतल्याचे म्हटले. मला हे प्रकरण इथेच थांबवायचे आहे. हा माझा खासगी विषय आहे. माझी काही तक्रार नाही असे तिने म्हटले. त्यामुळे तूर्त तरी शिरसाट कुटुंब अडचणीतून पार झाले आहे.