मुंबईतील भूमिगत मेट्रोचे शून्य पध्दतीने नियोजन

मुंबई- मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेमुळे पावसाळ्यात वरळीतील 141 टेनामेंट पालिका वसाहतीतील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. 2018 साली मेट्रोचे काम सुरू झाले आणि या कामामुळे 2019 पासून दरवर्षी पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी शिरू लागले. त्यामुळे दरवर्षी त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याबाबत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे फक्त आश्वासने देऊन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मेट्रोकडून केवळ 4 हजार रुपयांची अपुरी नुकसानभरपाई देण्यात आली. काहींना तर हे पैसेही मिळालेच नाहीत, तर काहींचे पैसे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीच हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे शहरातील वरळी येथील पहिली भुयारी ॲक्वा मेट्रो मार्गिका अक्षरशः पाण्यात गेली. आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते वरळी असा मार्ग असलेल्या या ॲक्वा लाईनचे उद्घाटन 9 मे रोजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच पावसामुळे आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरले आणि संरक्षक भिंत कोसळल्यामुळे संपूर्ण स्थानक जलमय झाले. छतावाटे कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांनी प्रवाशांना व स्थानिकांना मोठी गैरसोय झाली. मेट्रो स्थानकाशेजारी असलेल्या पालिका सफाई कामगार वसाहतीतही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर व ठेकेदारांवर हलगर्जीपणा व भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, या प्रकल्पात सांडपाणी व्यवस्थेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. हे काम अत्यंत घाईघाईत आणि निष्काळजीपणे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला गेली चार वर्षे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. 141 टेनामेंटमध्ये महापालिकेचे कर्मचारी राहतात. आम्ही शहरासाठी काम करतो, परंतु आमच्या घरात साचणाऱ्या पाण्यामुळे आमचे जीवन संकटात सापडले आहे. या सांडपाण्यामुळे अन्नधान्य खराब होते. कपडे, सामान वर ठेवावे लागते. लहान मुलांना घराच्या माळ्यावर ठेवावे लागते. मुसळधार पाऊस पडला की, मध्यरात्री घरातील पाणी काढणे, मुलांना सुरक्षित ठेवणे यामुळे आमचे खूप हाल होतात. आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. स्थानिक रहिवासी विशाल जाधव म्हणाले की, आम्ही इथे लहानाचे मोठे झालो. पण मेट्रो कामानंतरच पावसाळ्यातील त्रास सुरू झाला. 26 जुलै 2005 च्या पूरस्थितीतही आमच्या घरात पाणी घुसले नव्हते, पण आता प्रत्येक पावसात घरात पाणी तुंबते. यामुळे आमची मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि जेवणाचीही मोठी गैरसोय होते. दुर्गंधीमुळे राहणे अवघड होते. मनसे शाखाध्यक्ष विकास साळवी म्हणाले, 2018 पासून मेट्रोचे काम सुरू आहे.
स्थानिकांना कोणतीही माहिती न देता कामाची सुरुवात करण्यात आली. आम्ही वेळोवेळी तक्रार केली, पत्रव्यवहार केला, पण कोणीही काहीच ऐकत नाही. काल जेव्हा स्टेशनात पाणी भरले तेव्हा आम्ही आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतरच काही अधिकारी आले आणि त्यांनी तुंबलेले ड्रेनेज साफ केले. 2019 पूर्वी आम्हाला कधीही अशा समस्यांना सामोरे जावे लागले नव्हते. 26 जुलै 2005 च्या पुरात देखील आमच्या घरात पाणी शिरले नव्हते. मात्र मेट्रोच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आम्ही अनेक वेळा पालिकेला लेखी तक्रारी केल्या, पत्रव्यवहार केला. परंतु आमच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्या पत्रांना उत्तर मिळालेले नाही. गेल्या वर्षी मेट्रोकडून नुकसानभरपाई म्हणून केवळ चार हजार रुपये देण्यात आले. ही रक्कम अत्यंत अपुरी असून, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, कागदपत्रांचे झालेले नुकसान काहीच भरून निघत नाही. काहींनी रागाने हे पैसे नाकारले, तर काहींना ते मिळालेच नाहीत. हे पैसे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीच हडपले. आम्ही आमच्या समस्या वारंवार कळवूनही स्थानिक आमदार कधीच भेटायला येत नाहीत. ते फक्त निवडणुकीवेळी येतात, आश्वासने देतात आणि मतदान झाल्यावर गायब होतात.