मुंबईआठवड्याच्या सुरुवातीलाच चाकरमान्यांचे हाल करणाऱ्या पावसाचा जोर आज काहीसा ओसरला. त्यामुळे दोन दिवस घरातच अडकलेल्या, लोकलमुळे खोळंबा झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबई लोकलला आजही विलंबच झाला.
आज सकाळपासून मुंबईत पाऊस कमी होता. मात्र उपनगरात जोर कायम होता. परिणामी आजही लोकलचे वेळापत्रक कोलमडले. पश्चिम, मध्य आणि हार्बर या सर्वच मार्गावरील लोकल 10 ते 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारनंतर पावसाची रिपरिप काहीशी थांबली. हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. पण चाकरमानी घराबाहेर पडत असतानाच त्यामध्ये बदल करून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. यासोबतच पालघर, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला होता. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा तसेच नाशिकच्या घाटमाथ्याला यलो, तर पुण्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे चाकरमानी भीतभीतच घराबाहेर पडले, पण आज पावसाने विश्रांती घेतल्याने दिलासा मिळाला.
पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव यादरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. गोरेगाव ते सांताक्रूझ 15-20 मिनिटांच्या प्रवासासाठी वाहन चालकांना एक ते दीड तास लागला.
पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावर पहाटे 3.40 ते 5.31 दरम्यानच्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या . यामध्ये चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा तर विरारला जाणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या. विक्रोळीमध्ये सकाळी साडेआठ आधीच्या 24 तासात सर्वाधिक 229.5 मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रुजमध्ये 209 मिमी, भायखळ्यात 193.5 मिमी, जुहू 150.0 मिमी, वांद्रे 137.5 मिमी
आणि कुलाबा वेधशाळेत 107.4 मिमी पावसाची नोंद झाली . वसई, विरार, नालासोपारात पाऊस थांबला होता . मात्र पाण्याचा निचरा न झाल्याने काही भाग पाण्याखाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे घरांसोबतच तळमजल्यावरील दुकांनांचेही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. वसई विरारमध्ये काही भागात 12 तास वीजपुरवठा खंडित झाला होता .
वसई पश्चिमेकडील आनंदनगर, समतानगर, साईनगर, शंभर फुटी रस्ता, सनसिटी, दिवाणमान, डीजी नगर, अंबाडी रोड या वस्त्या आजही जलयम आहेत. वसई पूर्वेकडील मिठागर पाण्याखाली गेले आहे . मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
कल्याण तालुक्यात आज हलका पाऊस सुरूच होत्या . खडवली येथील भातसा नदीच्या पुलाला पाणी लागले. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खडवली येथील आंबेडकर नगर मधील घरांमध्ये भातसा नदीचे पाणी शिरले. कल्याणजवळ रायते नदीची पाणीपातळी वाढल्याने पात्रात अडकलेल्या कामगारांना पोकलेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. काळू नदीच्या पुरामुळे शहाड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने टिटवाळा रस्ता पाण्याखाली गेला. टिटवाळा जलमय झाले. कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला.
शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात 4-5 दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या महिन्यात 23 जुलैला धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले. आता मात्र भातसा धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी अकराच्या सुमारास 1.75 मीटरने उघडण्यात आले.
