Home / महाराष्ट्र / राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट

राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट

Rainstorm in the state! 6 people died


मुंबई- राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीला 48 तासांचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई-ठाण्यात उद्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. याशिवाय मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे आज 6 जणांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली. मात्र आज उबाठा नेते उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे व मनसे नेते राज ठाकरे कुठेच दिसले नाहीत.
मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले. नालासोपारा स्थानकासमोरचा रस्ता, वडाळा रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दादर, किंग्ज सर्कल परिसरात शाळेची बस पाण्यात अडकली. अंधेरी सबवे, चुनाभट्टी, मिठी नदी परिसर, मलबार हिल, कुर्ला, नालासोपारा आणि सायन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकांचे हाल झाले. पाण्याचा उपसा करणारे पंप सकाळी चालले. मात्र काही तासांनंतर ते बंद पडले. यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यातच स्थिती पाहून ठाणे व मुंबईतील दुपारच्या शाळा बंद केल्या. सकाळी शाळेत गेलेल्या मुलांना पाणी भरलेल्या रस्त्यांतून घरी आणायची कसरत पालकांना करावी लागली. मुसळधार पावसाने शहरातील वाहतूक आणि जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. रूळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे साधारण 10-15 मिनिटांनी तर हार्बर रेल्वे 20 मिनिटांनी उशिराने धावत होती. कुर्ला, माटुंगा, दादर, सायन आणि अंधेरीच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली होती. अंधेरी सबवेमधील वाहतूक बंद करण्यात आली. हिंदमाता, दादर परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आरेमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रुईया महाविद्यालयासमोरील रस्ता पाण्यात गेला होता. सायन येथे साचलेल्या पाण्यात अडकलेल्या शाळेच्या बसमधून विद्यार्थ्यांना माटुंगा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. अनेक सखल भागांत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दुपारच्या सत्रासाठी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. यावेळी प्रशासनाने नागरिकांना केवळ गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन केले.चेंबूरमध्ये अशोकनगर परिसरात एमएमआरडीएची भिंत कोसळल्याने सात झोपड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय सायन, धोबीघाट, विवेकानंद नगर, एअर इंडिया कॉलनी, अंधेरी, खार, आग्रीपाडा आदी ठिकाणी झोपडपट्टी भागांत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेले. विलेपार्ले सबवे, खेरवाडी, टिळकनगर, साळापूर, मिलिंद नगर, भक्ती सुधा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला होता.
नवी मुंबई कृषी बाजार, परळ, कल्याण, डोंबिवलीमध्येही पावसामुळे रेल्वे सेवा उशिराने सुरू होत्या. दहीसर, टोलनाका, घोडबंदर मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सकाळी नगरपालिकेने पंप चालू केले. मात्र नंतर पंप बंद पडल्याने पाण्याची समस्या अधिक वाढली.
पावसामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. खराब हवामानामुळे नऊ विमानांचे लँडिंग रद्द केले तर काही विमानांना गो-अराऊंड करण्यात आले. तर एक विमान दुसऱ्या विमानतळावर वळवले. इंडिगोने एक्स पोस्टमध्ये सांगितले की, मुंबईत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. प्रवाशांनी लवकर निघावे आणि वेबसाईट किंवा ॲपवरून फ्लाईट स्टेटस तपासण्याची विनंती केली आहे. अक्सा एअर आणि मुंबई विमानतळ प्रशासनानेही अशाच सूचना दिल्या असून, प्रवाशांनी वेळेचे योग्य नियोजन करून विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरूसारख्या शहरांत जोरदार पाऊस सुरू असल्याने हवाई प्रवासात अडथळे येण्याची शक्यता असल्याचा इशारा विमान कंपन्यांनी दिला आहे.
मुंबई, ठाणे प्रमाणे रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 215 मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल रोहा तालुक्यात 120 मिमी तर उरण तालुक्यात 51 मिमी नोंद झाली. दापोली, दाभोळ या राज्यमार्गावर दापोली शहरात स्टेट बँकेच्या बाहेर नाल्यातील पाणी रस्त्यावर होते. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली तर बावनदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. वांद्री उक्षी परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने काही रस्ते पाण्याखाली गेल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून, माणगाव, रोहा व किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही तासांचा रेड अलर्ट जाहीर केला.
हिंगोलीच्या आजगाव गावामधून जाणारे सर्व रस्ते पुरामुळे बंद झाले. सततच्या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावात रहिवासी रोहिदास पाटील यांचे घर कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कोल्हापूरच्या शाहुवाडीतील कासारी नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. संगमेश्वर, देवरुख येथे संरक्षक भिंत कोसळल्याने दुकानांची व वस्तूंची मोठी हानी झाली.
परभणी जिल्ह्यात, मुसळधार पावसामुळे येलदरी धरणाचे दहा, लोअर दुधना धरणाचे चार दरवाजे उघडले. गोदावरी, पूर्णा व दुधना नद्यांची पूरसदृश्य स्थिती आहे.
साताऱ्याच्या पश्चिम घाटात जोरदार पावसामुळे कोयना धरणातून 12 हजार 100 क्युसेक्स पाणी सोडले. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला. अकोला जिल्ह्यात मोरणा नदीला पूर आल्याने रामबोनू पुलावर पाणी साचले असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे. जालन्यातील सीना नदीला पहिल्यांदाच पूर आल्याची नोंद झाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग केला. कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 20 फूटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडल्यामुळे ते पाणी भोगावती नदीमार्गे पंचगंगेला जाऊन मिळाले.
हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न सायक्लोनिक सर्क्युलेशन यांच्या संयुक्त प्रभावामुळे कोकण आणि मुंबई भागात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. वेधशाळेने जारी केलेल्या रेड अलर्ट भागात मुंबई, ठाणे, रायगड, लातूरसह संपूर्ण कोकण पट्टा समाविष्ट आहे. तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारीची सूचना दिली आहे. याशिवाय समुद्रकिनाऱ्यांच्या भागांसाठी मच्छीमारांना समुद्रात जाणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून काही भागांमध्ये अतिवृष्टी होत आहे. 18 ते 21 ऑगस्टदरम्यान काही भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणातील जगबुडी, अंबा, कुंडलिका नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. वशिष्ठी नदीमुळे चिपळूणमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. त्या संदर्भात प्रशासनाने नियोजन केले आहे. नाशिक विभागात तापी आणि हतनूर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने विसर्ग सुरू केला. पुणे जिल्ह्यात सर्व धरणांमध्ये पाणीसाठा भरपूर आहे. मात्र सध्या कोणतेही धरण इशारा पातळीवर पोहोचलेले नाही. अलमट्टी धरणाच्या बाबतीत कर्नाटक सरकारसोबत सातत्याने संवाद साधला जात आहे. राज्यात 800 गावांमध्ये अतिवृष्टीची स्थिती आहे. इसापूर आणि विष्णुपुरी भाग इशारा पातळीच्या जवळ असल्याने विसर्ग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली भागातही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती विभागातील अकोल्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. येथील मूर्तिजापूर व पातूरमध्ये पावसाचा प्रचंड प्रभाव होता. चांदूर, तिवसा, मेहकर, वाशिम, उमरखेड, महागाव, जरी-जांमणी, पूसद या भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे दोन लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील पावसाबाबत त्यांनी सांगितले की, मागील 48 तासांत सुमारे 200 मिमी पाऊस झाला आहे. ज्यापैकी 6 ते 8 तासांत 170 मिमी पावसाची नोंद झाली. चेंबूरमध्ये सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत 14 ठिकाणी पाणी साचले होते. त्यापैकी दोन ठिकाणी वाहतूक ठप्प झाली, पण इतर ठिकाणी वाहतूक हळूहळू सुरू होती. रेल्वे सेवा पूर्णपणे बंद नव्हती तर धीम्या गतीने सुरू होती. पुढील काही तासांसाठी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे दुपारच्या सत्रापासून शाळांना सुट्टी देऊन मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही लवकर निघण्याची परवानगी दिली. आज समुद्रात तीन मीटर आणि उद्या चार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. भरतीमुळे समुद्र आणि नाल्यांची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे बीएमसीने पाणी पम्पिंगची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळावे. डॉप्लर आणि हवामान यंत्रणांद्वारे अलर्टचा अभ्यास करून उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. जेथे लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागते, तिथे त्यांच्या निवाऱ्याची उत्तम व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पावसामुळे झालेल्या अडचणींवर प्रशासन तातडीने उपाय करत आहे. मुंबईतील पावसात मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याने ही सकारात्मक बाब आहे.
मध्य रेल्वे अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याण, कसारा आणि कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा वेग पावसामुळे मंदावला होता. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील गाड्या 6-7 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरील कुर्ला, चेंबूर आणि चुनाभट्टी भागात पाणी साचल्याने गाड्या 12-15 मिनिटे उशिराने आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्याही 6-7 मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रशासन सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. लोकमान्य टिळक टर्मिनससारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंप लावले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यास प्रवास करावा.