मुंबई- हिंदी सक्तीच्या मुद्यावरून प्रथमच एका मंचावर आल्यावर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आता ठाकरे ब्रँड बनून पालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही ठाकरे बंधू अधिकृत युतीबद्दल अजून काहीच बोलत नसले तरी आपण एकत्र आल्याचे ते वेगवेगळ्या घटनांतून आवर्जून दाखवत आहेत. आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी आपल्या घरी येण्याचे प्रथमच निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण उद्धव ठाकरे स्वीकारतील हे उघड आहे. हा कौटुंबिक सोहळा पाहण्यास सर्वच उत्सुक आहेत.
राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अनेक नेते येत असतात. यात आजवर भाजपा नेत्यांची संख्या अधिक होती. नितीन गडकरी, फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, नारायण राणे, उदय सामंत अशा अनेकांनी त्यांची घरी भेट घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे कधीही त्यांच्या घरी गेलेले नाहीत. यंदा राज ठाकरे यांनी त्यांना फोन करून गणेशोत्सवासाठी सहकुटुंब आपल्या घरी शिवतीर्थावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणाचा मान राखून उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य-तेजस हेही शिवतीर्थावर जातील असे संकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. जवळजवळ 20 वर्षांनी ते मातोश्रीवर गेले होते. तेव्हा त्यांनी उद्धव यांच्याशी संवाद साधला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतही ते गेले होते. यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र येणार असल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कालच मनसे नेते अमित ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी, तुम्हाला सरप्राईज मिळेल असे उत्तर दिले होते. आज हे सरप्राईज उघड झाले.
दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी आज मतचोरी या विषयावर एकमत जाहीर केले. दोघांनी मतचोरीबाबत सतर्क राहा, असे कार्यकर्त्यांना सांगत भाजपावर निशाणा साधला. आज पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, मी लोकांना लोकसभेवर बहिष्कार टाकण्याबाबत सांगत होतो. ती जागतिक बातमी झाली असती. राहुल गांधींनी मतचोरी प्रकरण उघड केले आहे. मी यापूर्वीच सांगत होतो की, आपल्याकडे मतदान व्यवस्थित होत नाही. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड सुरू आहे. आपली मते चोरली जात आहेत. त्यामुळे आपल्याला सतत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. याची सखोल चौकशी झाली, तर मागील 10 ते 12 वर्षांतील अनेक बाबी उघड होतील. त्यामुळे या मतचोरीची चौकशी झाली पाहिजे. माझ्या हातात प्रत्येकाची यादी आली पाहिजे, ती नीट तपासली आहे हे मला जाणवले पाहिजे, जर यादी आली नाही तर मी निवडणूक लढवणार नाही. मतदार यादीच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दहिसर येथे शिवसेना शाखांना भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक गटप्रमुख आणि प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वॉर्डात मतदारयादीत मतचोरी होते का, मतचोर घुसलेत का हे बघा. घरोघरी जाऊन एका व्यक्तीकडे एकच मत आहे का, ते पाहा. विधानसभेत त्यांनी 35 ते 40 लाख मतदार वाढवले . जे मतदार घुसवले ते शोधा . नाहीतर पुन्हा बोगस मतदान होईल. काही ठिकाणी दुबार-तिबार मतदान केले जाते. आगामी निवडणुकीत आपल्या बाजूने मतांचा पाऊस कसा पडेल हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक गटप्रमुख व कार्यकर्त्याची आहे. आम्हाला धक्के देणारे अनेक आले आणि गेले. धक्का कदाचित कमी बसला असेल, पण धोका झालेला आहे. यानंतरही आम्हाला धोका देण्याचा प्रयत्न होईल, पण जोपर्यंत तुमची तटबंदी आहे, तोपर्यंत धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, बाकी काही होणार नाही. आता विघ्नहर्त्याचे आगमन होणार आहे. त्याला साक्षी ठेवून सांगतो, आम्ही हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन निघालो आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या काळ्या मांजरी आडव्या येतात. त्या काळ्या, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर नाहीतर आम्ही आहोतच.
