राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत! सत्ताधाऱ्यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील सुनहरी बाग मार्गावरील शासकीय निवासस्थानी काल इंडिया आघाडीतील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून महायुती सत्ताधारी पक्षातील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने महाराष्ट्राचा अपमान झाला, अशी टीकेची झोड उद्धव ठाकरेंवर उठवली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन उपरोधिक आंदोलन केले. यावेळी शिंदेसैनिकांनी, साहेब यांना (उद्धव ठाकरे ) माफ करा अशी घोषणाबाजी करत पोस्टर झळकवले. यावेळी आ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, जेव्हापासून महाविकास आघाडी स्थापन झाली. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मुख्यालय दिल्ली झाले आहे. त्यांचे आका राहुल गांधी आणि सोनिया गांधी असल्याचे आता सगळ्यांना स्पष्ट समजले आहे. जे उद्धव ठाकरे भाजपा -शिवसेना युतीत सन्मानाने बसायचे, ज्यांच्या शब्दाला वजन होते, त्यांना आता दिल्लीतील इंडिया बैठकीत पाचव्या-सहाव्या रांगेत बसवले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांचा अपमान झाला त्यांना काही वाटत नसेल तर काय प्रतिक्रिया द्यायची. जे स्वाभिमान विकतात त्यांना काँग्रेसने त्यांची जागा दाखवली.

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक्सवर लिहिले की, उद्धव ठाकरे काय ही तुमची किंमत? शिवरायांचा वारसा सांगता आणि खांग्रेसच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलात? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातील काहीच घेतले नाही नाही का? आदित्य ठाकरे काँग्रेसने तुमची काय अवस्था केली? एकेक खासदार असलेल्या पक्षांना सन्मान देऊन पुढच्या रांगेत बसवले. तुम्ही दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची लाज घालवली. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा.

तर राज्याचे सांस्कृतिक मंत्री व भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठे बसवले? त्यांना बरोबर का घेतले नाही? ते बाजूला का नव्हते या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचे शहाणपण उद्धवजी यांना आणि त्यांच्या पक्षाला सुचेल, अशीच अपेक्षा आहे. मात्र एक गोष्ट मी ठामपणे म्हणेन की उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवणे हा काँग्रेसने एका अर्थाने महाराष्ट्रातील मराठी माणसाचा केलेला अपमान आहे.

या टीकेनंतर उबाठा खासदार संजय राऊत यांनी असा खुलासा केला की, उद्धव ठाकरे मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. या बैठकीत स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो. नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो. हे भाजपाचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे आणखीही फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवारदेखील आमच्या सोबत बसले होते.

मोदीही मागच्या रांगेत
तेव्हा भाजपाचे मौन

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवल्याने शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका करत आहेत. मार्च महिन्यात कॅनडा येथे झालेल्या जी-सेव्हन शिखर परिषदेत मोदी विशेष आमंत्रित होते. तिथे फोटोसेशनच्या वेळी त्यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम आणि इटालीच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्जिया मेलोनी यांना पुढच्या रांगेत स्थान मिळाले होते. त्यावेळी देशाचा अपमान झाला, अशी टीका कुणीच केली नव्हती.