वाल्मिक कराडची मागणी! देशमुख हत्येत मी निर्दोष

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला मोक्कातून दोषमुक्त करावे, अशी मागणी कराडच्या वकिलाने आज न्यायालयात केली. या प्रकरणावर सुमारे ५० मिनिटे सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी मंगळवार १७ जून रोजी होणार आहे.

या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात असून तो आज न्यायालयात हजर होता. खटल्याची ही सहावी सुनावणी होती. आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित होते. कराडच्या वतीने वकील विकास खाडेकर आणि मोहन यादव यांनी बाजू मांडली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून ती करून घ्यावी, असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. मात्र, अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत, असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला. त्याला मोक्कातून दोषमुक्त करावे, अशी मागणीही कराडच्या वकिलांनी केली.

दरम्यान कराडवर इतरही गुन्हे दाखल असल्यामुळे जर त्याला मोक्कामधून दोषमुक्त केले तर उर्वरित गुन्ह्यांत काय कार्यवाही होणार? असा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला. यावर न्यायालयाने असा निर्णय घेतला की, सर्व संबंधित अर्जांवर एकत्रित सुनावणी घेण्यात यावी आणि त्यानंतर दोषमुक्ती अर्जावर विचार करण्यात यावा. सरकारी पक्षाने कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज केला होता. यावरही १७ जून रोजी सुनावणी होणार आहे.

सुनावणीनंतर वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, वाल्मिक कराडला मोक्कातून मुक्त करावे यावर आधी सुनावणी घेण्यात यावी. अशी मागणी बचाव पक्षाने केली. त्यावर आम्ही कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. केवळ कराडनेच दोषमुक्तीचा अर्ज केला आहे. इतर आरोपींनी अर्ज केलेला नाही. कराडच्या दोषमुक्त अर्जावर आम्ही न्यायालयाला म्हटले केले की त्याला दोषमुक्त करावे किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावेत. ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील तेव्हा मी उपस्थित असेन. पण १७ तारखेच्या सुनावणीला मी नसेन.